त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच औचित्य साधुन रमा एकादशी निमित्त जवळपास दहा हजार पेक्षा जास्त वारकऱ्यांनी ब्रह्मगिरी संत प्रदक्षिणा पूर्ण केली. भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, या सणाची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने व्हावी या हेतुने रमा एकादशीच्या दिवशी श्री निवृत्तीनाथांच्या पादुका घेऊन हजारो वारकरी प्रदक्षिणेला जातात. श्री निवृत्तीनाथ भजनी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं हे अकरावे वर्ष होय.
सकाळी सात वाजता श्री निवृत्तीनाथ मंदिरा पासून प्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. कुशावर्ताला वंदन करून भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन वारकरी प्रदक्षिणेला रवाना झाले. असंख्य टाळमृदुंगाच्या तालावर अभंग गायनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सात्विक प्रदक्षिणा कशी असावी ? याच एक उत्तम उदाहरण म्हणुन या सोहळ्याकडे बघता येईल. या प्रदक्षिणेमध्ये नामवंत किर्तनकार, प्रवचनकार यांचे सह हजारो टाळ करी, पखवाज वादक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला व दहा हजारांपेक्षा जास्त अबालवृध्द वारकरी सामील झाले होते. महिलावर्गाचा सहभाग लक्षणीय होता.