त्र्यंबकेश्वर – धबधब्यासाठी सुप्रसिध्द असलेल्या दुगारवाडी भागात दोन चिमुरड्यांवर बिबट्याने हल्ला केला. नागरीकांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने बालकास सोडून पलायन केले. त्र्यंबकेश्वर जवळ कळमूस्ते दूगारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात २ बालके जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे ६ वाजेच्या सुमाराला घडली. १२ वर्षीय बालक भिवाजी गोविंद सोहळे, ८ वर्षीय बालक विशाल सुरूम हे दोघे पहाटे ६ वाजता लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने लोकांना पाहताच बिबट्या पळून गेला. दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमींना तातडीने नुकसानभरपाई द्यावी व त्र्यंबकेश्वरच्या वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे आम्ही अनेक दिवसा पासून पाठपुरावा करत आहोत. मात्र त्याकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे यांनी यावेळी केला. या हल्ल्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, भगवान डोखे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.