त्र्यंबकेश्वर – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी उघडण्यात आले. तब्बल १६४ दिवसांनी परत एकदा भाविकांना भोलेनाथाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षात पहिल्या लॅाकडाऊन मध्ये २६१ दिवस तर दुसर्या लॅाककडाउन मध्ये १६४ असे तब्बल ४२५ दिवस त्र्यंबकेश्वर मंदीर बंद होते तर या कालावधीत फक्त १३१ दिवस मंदिर दर्शनासाठी सुरु होते. मंदिरच बंद असल्याने भाविक यात्रेकरू जास्त संख्येने त्र्यंबकेश्वरला येत नव्हते. त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था येथे येणारे भाविक व पर्यटकांवरच अवलंबुन असल्याने गेले दीड वर्षांपासून नगरीची सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे आहे. मंदिर बंद असल्याने परिसरातील वातावरण उदास भासत होते, पण आज मंदिर उघडताच वातावरणात एक प्रकारचे चैतन्य पसरले.राज्य सरकारने दर्शनाबाबत एक नियमावली केली आहे. या नियमावलीचा वापर भाविकांनी काटेकोर करावा असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे. पहाटे सहा पासूनच भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या शिवभक्तांनी दरवाजा बाहेर गर्दी केली होती. यात स्थानिकांबरोबरच परगावच्याही भाविकांचा समावेश होता. बरोबर सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आले. भगवान भोलेनाथाच्या जयघोष करण्यात आला.
यावेळी विविध आखाड्यांचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश गंगापुत्र, नगरसेवक शाम गंगापुत्र, किरण चौधरी, सचिन लोखंडे, दिलीप चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, भुषण गंगापुत्र नियोजनावर लक्ष ठेवुन होते. देवस्थान ट्रस्टचे अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, विजय गंगापुत्र व कर्मचारी भाविकांना योग्यत्या सुचना देऊन दर्शनरांगेचे नियोजन करीत होते. स्थानिक नागरीक व सशुल्क दर्शन घेणार्या भाविकांना ऊत्तर दरवाजाने तर बाहेरगावच्या भाविकांना पुर्व दरवाजाने मंदिरात प्रवेश देऊन उत्तर दरवाजाने बाहेर सोडण्यात येत होते. नियमावलीचे पालन करीत भाविक दर्शन घेत होते.
प्रथम दर्शनार्थी जुना आखाड्याचे महंत सुकदेवगिरी महाराज व खडेश्वरी आत्मादास महाराज यांचा देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम व भुषण अडसरे यांनी शाल, श्रीफळ व भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन सत्कार केला. लॅाकडाउन काळात त्र्यंबकेश्वराच्या मंदिरा बरोबरच पवित्र कुशावर्त तिर्थ सुध्दा भाविकांना स्नानासाठी बंद करण्यात आले होते. आज तेही मोकळे करण्यात आले तत्पुर्वी गंगापुत्र परिवाराच्या वतीने गंगापुजन करण्यात आले. यावेळी गंगापुत्र घराण्यातील जेष्ठ सदस्य शंकर, सुरेश तात्या, यांचेसह दिलीप, विशाल, सोनु, मनोज, योगेश, वैभव आदिंसह नंदकुमार मोरे, चंद्रकांत माळी, महिलावर्ग, भाविक उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झीरवाळ यांनीसुध्दा आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजिवन समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी कुशावर्त तिर्थावर येऊन गंगापुजन केले. नंतर भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे समवेत आमदार हिरामण खोसकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, मनोज काण्णव, बहिरु मुळाणे, अरुण मेढे, दिलीप पवार, संतोष माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिर उघडल्यामुळे नगरीची विस्कळीत झालेली अर्थकरणाची गाडी लवकरच रुळावर येईल असा विश्वास नागरीकांनी व्यक्त केला.