नाशिक – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग व संत श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज समाधी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा तीर्थयात्रा सोहळा यावर्षी प्रथमच फाल्गुन वद्य ४ रविवार दि. ६ मार्च ते फाल्गुन शुक्ल.९ शनिवार दि.१२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हभप बापूसाहेब म. डफळ यांनी दिली आहे. या सोहळ्यात वारकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वै.हभप आत्माराम महाराज नाशिककर व हभप मठाधिपती माध्यम महाराज घुले यांच्या आशीर्वादाने व विधानसभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर,देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या गणेशगावचे सरपंच तुषार डहाळे यांच्यासह श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, श्री ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट,श्री जोग महाराज भजनी मठ इगतपुरी,हभप जयंत महाराज गोसावी व बापू बाबा देवरगावकर सेवेकरी मंडळाच्या विशेष सहकार्याने हा सोहळा होत आहे.
या श्री त्र्यंबकेश्वर तथा श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांनी येतांना आपला बिछाना, औषधे, बॅटरी, तांब्या सोबत आणायचा आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता शनिवार दि. ५ मार्च रोजी श्री जनार्दन स्वामी आश्रम येथे मुक्कामी येणे आवश्यक आहे. हा सोहळा सात दिवस चालणार असून याची सुरुवात संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर येथून यादरम्यान दररोज अभिषेक, काकडा भजन, वारकरी नित्यनेम भजने, गौळणी, नाट, प्रवचन, दोन हरिपाठ व मुक्कामी कीर्तन होणार होईल. या सोहळ्याबाबत अधिक माहितीसाठी हभप बापूसाहेब म. डफळ (मो. ९८९०६६२०७५), हभप दत्तात्रय फुगे (मो. ९७६६१७४००० ), हभप भगवान कापसे ( ८२७५०१९१९७), हभप निवृत्ती म.कापसे ( ९४२२२६७२८५) , विठोबा कापसे (मो. ९५५२६९४७५३ ) ज्ञानेश्वर कराड ( मो. ९८२२६६४०३७) माधव गायधनी (सरपंच पळसे मो. ९९७५३६९३५२ ) आदींशी संपर्क साधता येणार आहे.
प्रदक्षिणा सोहळा महिमा / महत्व
श्रीमन्निवृत्तिनाथ महाराज समाधी देण्याकरिता आलेला साधू संत व देवदेवता हे सप्तशृंगावरून पंचवटीस आले तेथून ते त्र्यंबकेश्वरास उजवी प्रदक्षिणा तीर्थक्षेत्र कावनई मार्गे हरिहरेश्वर येथे गेले व तेथून चक्रतीर्थ व कोटीतीर्थ करून त्र्यंबकेश्वर आले. ‘ सुरस सर्वातीर्थें आदिपुरातन ! केली नारायणे तीर्थयात्रा ‘अशी हि पंचक्रोशी प्रदक्षिणा तेव्हा सर्वांनी केली .त्यानंतर अनेक साधुसंत, ऋषीमुनी,सिद्ध साधकांनी हि प्रदक्षिणा केली व सांप्रत काळात वै. हभप आत्माराम महाराज नाशिककर यांनी अनेक वारकऱ्यांसह ही प्रदक्षिणा केली आहे. त्यांच्या व्रतास डोळ्यापुढे ठेऊन समस्त महाराष्ट्रातील वैष्णवजन तथा नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत वारकऱ्यांनी या प्रदक्षिणेचे आयोजन केलेले आहे.
असा आहे प्रदक्षिणा सोहळ्याचा मार्ग
प्रयागराज तीर्थ -अंजनेरी- तळेगाव ( १ ला मुक्काम) – जातेगाव- दहेगाव- वाडीवऱ्हे धरण- मुकणे कावनई (२ रा मुक्काम ), रायअंबे- करोळे- ओंडली नागोस्ली – वावी हर्ष (३ रा मुक्काम ),टाके हर्ष – देवगाव – डहाळेवाडी – चंद्राची मेट / जांभूळवाडी – कळमुस्ते (४ था मुक्काम ), काचूर्ली- सायगाव- शिरसगाव – धुमोडी /ब्राह्मणवाडे – पिंप्री त्र्यंबक (५ वा मुक्काम ) बेझे- चक्रतीर्थ-चाकोरे- राजेवाडी – गणेशगाव ( मुक्काम ) – ममईची वाडी- अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रम येथे हभप ज्ञानेश्वर माउली कदम यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होईल.