त्र्यंबकेश्वर – त्र्यंबक तालुक्यातील चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे (वय ३८) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत रामू हा रानात गुरे चारत असतांना वीज कोसळली. तसेच अंबई येथील सुनील बाबुराव भुतांबरे यांच्या १० शेळया गावाजवळच माळरानावर चरत असतांना वीज पडून ठार झाल्या आहेत. गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे. तालुक्यातील सामुंडी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वळवाचा पाऊस झाला. या पावसाच्या दरम्यान येथे झाडावर वीज कोसळली. झाडाजवळ लहामटे यांचे घर असून घराजवळ उभ्या असलेल्या आई रंजना वसंत लामटे, वय वर्ष ४५ त्यांच्या तीन मुली अपेक्षा(१४वर्ष), अक्षरा(११वर्ष), छाया(९वर्ष) या तीन मुली व मुलगा ऋषी (४वर्ष) यांना जवळच्या झाडावर पडलेल्या वीजेचा झटका बसला व हे सर्व बेशुद्ध झाले. आई रंजना या लगेचच शुद्धीवर आल्या असता त्यांनी त्यांच्या लहान मुलाला आणि मुलींना उठवले. मात्र यात छाया वसंत लामटे ही अर्धा तास शुद्धीवर न आल्याने त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता ती शुद्धीवर आली. तीची उजवी बाजू अधिक बधीर झाली आहे. तसेच इतर दोन मुली आणि आई यांना उजव्या हाताला झटका बसला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही हानी न होता सर्वजण सुखरूप आहेत. ञ्यंबक उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांचेवर उपचार केले. तहसीलदार दिपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, सतीश निकम यासह मंडल अधिकारी हेमंत कुलकर्णी, रोकडे यांनी तालुक्यातील माहिती घेत नुकसानीचा अंदाज घेतला.