रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर – श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गेले आठ दिवसांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले मंदिराचे व्दार आज सकाळी ७ वाजता उघडण्यात आले. यावेळी विविध आखाड्यांचे साधुसंत, ग्रामस्थ व भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष करुन आरती करण्यात आली.
अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी ५ जानेवारी ते १२ जानेवारी असे आठ दिवस भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर भाविकांचे दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आज सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी विविध आखाड्यांचे साधुमहंत व भाविकांनी हर हर महादेवचा एकच जयघोष केला. मंदिराच्या उत्तर दरवाजा समोर ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांचे हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सचिव तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, विश्वस्त प्रशांत गायधनी, भुषण अडसरे, भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शामराव गंगापुत्र, किरण चौधरी, पुरोहित अनंता दिघे, रत्नाकर जोशी, संजय देवकुटे, मुकुंद धारणे आदींसह भाविक उपस्थित होते. आरती म्हणतच हा सर्व लवाजमा मंदिराचे प्रांगणातून मंदिरात आला. साधुसंतांनी गर्भगृहात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी तुंगार ट्रस्टचे प्रदीप तुंगार, सुशांत तुंगार, विलास तुंगार, मनोज तुंगार उपस्थित होते. यानिमित्ताने मंदिराच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दि केली होती.
या दरम्यान त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर व पिंडीच्या खळग्यातील अंगठ्याच्या आकाराच्या तिन्ही वालुकामय लिंगावर वज्रलेप करण्यात आला. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक शेखर देसरडा यांनी त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण केलेले चांदीचे दरवाजे गर्भगृहास बसविण्यात आले. त्याशिवाय मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहाल ही दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. दररोज रात्री शयनारती झाल्यानंतर भगवान त्र्यंबकराज शयनासाठी हर्षमहालात येतात अशी परंपरा आहे. हा हर्षमहाल म्हणजे सिसम आणि सागवानी लाकडावर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचेही पूनः सौंदर्यकरण आणि नूतनीकरण केले आहे. तो भाविकांना वर्षातून तीन वेळाच भाविकांना पाहता येत होता, आता तो भाविकांना दररोज दर्शनासाठी खुला करण्यात येत आहे. सभामंडपातील दर्शनरांगेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग्ज काढून स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग्ज बसविण्यात आल्या आहेत. ऊर्वरित संवर्धन कामे लवकरच सुरु होतील मात्र त्यासाठी मंदिर बंद ठेवण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली. सदरची विकासकामे ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी व विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाखाली व पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.