त्र्यंबकेश्वर – दोन वर्षानंतर चालुवर्षी कोरोनाचे निर्बंध मुक्त झाल्याने मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठया उत्साहात, जल्लोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला. पाच आळी परिसरातील देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण संस्थेच्या श्रीराम मंदिरात या निमित गुढी पाडव्या पासून विविध धार्मिक कार्यकमांच आयोजन करण्यात आले असुन चैत्र वद्य द्वितिया अर्थात १८ एप्रिल पर्यंत सदर कार्यक्रम सुरू राहणार आहेत .
मंदिराचे गर्भगृह व संपूर्ण मंदिराला संगमरवर लावल्याने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच जन्मोत्सवा निमित्ताने मंदिर पानाफुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी ठीक १० वाजता स्थानिक रहिवासी ह.भ.प. रविंद्रबुवा अग्निहोत्री यांच्या सुश्राव्य जन्मोत्सवाच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन सेवेत सदानंद टोके यांनी संवादिनी वादन सेवा तर धनंजय महाजन हे तबला वादन सेवा दिली. यावेळी भाविकांच्या गर्दीने मंदिर पुर्णपणे भरले होते. तर असंख्य भाविक मंदिरा बाहेरील मंडपात बसले होते. या दरम्यान सर डॉ. मोरेश्वर सदाशिव गोसावी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच वैद्य कु. समिक्षा रामचंद्र कळमकर, श्रीकृष्ण गणेशशास्त्री टिल्लू, रोहित मकरंद तेलंग यांचा ऋण निर्देश म्हणुन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बरोबर १२ .४० वाजता किर्तनकारांनी राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गीत म्हणताच गर्भगृहा समोरील पडदा सरकविण्यात आला, पांच्यजन्याचा निनाद करण्यात आला. भाविकांनी प्रभू रामचंद्रांचा जयघोष करीत देवांच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी केली. मंदिरा बाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रभू रामचंद्र, बंधु लक्ष्मण, सितामाई व हनुमान यांच्या मुर्तींना नवीन पोषाख करून साजश्रृंगार करण्यात आल्याने दृष्ट लागावी असे मुर्तीचे विलोभनीय रुप दिसत होते . विविध प्रकारचे पदार्थ नैवेद्यासाठी ठेवण्यात आले होते. सुगंधी धुपाचा सुवास सर्वत्र दरवळत होता. यामुळे वातावरण चैतन्याने भारलेले भासत होते . यानंतर पानाफुलांनी सजविलेल्या पाळण्यात प्रभू रामचंद्रांची मुर्ती ठेवण्यात आली. किर्तनकारांनी पाळणा गीत म्हटले तर महिलांनी पाळण्याला झोका दिला. पाळण्यातून प्रभू रामचंद्रांची मुर्ती बाहेर काढल्यानंतर असंख्य मातांनी आपल्या तान्हुल्यांना पाळण्यात ठेवले. यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून खिरापत व सरबत देण्यात आले.