रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर – गेल्या तीन दिवसांपासून विश्वकल्याणार्थ त्र्यंबकेश्वर येथे सुरु असलेल्या वसंतोत्सव अर्थात बोहाड्याची सांगता आज देवी मिरवणूकीने करण्यात आली. ३१ मार्च पासून तीन दिवस त्र्यंबकेश्वरला बोहड्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील मृत्युंजय बहूउद्देशीय सामजिक संस्था, त्र्यंबकेश्वरचा राजा मित्र मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने या तीन दिवसीय बोहड्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी २४ सोंगे, दुसर्या दिवशी ४० सोंगे तर तिसर्या दिवशी तब्बल ३४ सोंगे काढण्यात आली. तीन दिवस भालदार चोपदारां सह ग्रामस्थांना बोहाड्याचे आमंत्रण देण्यात आले.
डगळे, श्रीगणेश व शारदा, खंडेराव, म्हाळसा, वाघे मुरळ्या, कच्छ मच्छ, वराह अवतार, श्रीकृष्ण परशुराम युध्द, भस्मासुर मोहिनी, चारण बालन, मारुती जम्बु माळी युध्द, त्राटीका व श्रीराम लक्ष्मण युध्द, वाली सुग्रीव युध्द, त्राटीका व राम लक्ष्मण युध्द, सुर्य चंद्र, श्रावणबाळ, नारदमुनी, लहरी राजा, शंकर सोंड्या राक्षस युध्द, एकादशी व राक्षस युध्द, द्वादशी राक्षस युध्द, रक्तांबिका देवी व राक्षस युध्द, पांडव ताटी, कौरव ताटी, कर्ण अर्जुन युध्द, इंद्रजित लक्ष्मण युध्द, रावण व राम लक्ष्मण युध्द, दुंदुभी, भैरव लाळ्या दैत्य युध्द, शंकर त्रिपुरासूर युध्द, वेताळ, विरभद्र, नृसिंह असे विविध पौराणिक कथांवर आधारीत सोंगे मिरवण्यात आली. सोंग नाचवण्यामध्ये युवक वर्ग व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
कुशावर्तापासून लक्ष्मीनारायण चौकापर्यंत सोंग नाचवण्यात आली. प्रत्येक सोंगाचा पदन्यास बघण्या सारखा होता. कान्हा हेरंभ शिखरे या बालकाने घेतलेल्या शारदेच्या सोंगाचा पदन्यास अप्रतिम होता. किरण देवकुटे व उमेश गोडबोले यांनी भस्मासुर मोहीनीचे सोंग साकारले, यातील उमेशने एखाद्या कसलेल्या नर्तकीला लाजवेल असे मोहीनीचे अप्रतिम नृत्य केले. मिलिंद धारणे यांनी साकारलेले चारण सोंगाने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. यश शिखरे यांनी साकारलेले रामाचे सोंग अप्रतिम होते.
भगवान त्र्यंबकेश्वराचे वंशपरंपरागत प्रदोष पुष्प पुजक उल्हास आराधी यांचे पुतणे नगरीचे प्रथम आयआरएस अधिकारी तथा नाशिकचे इन्कम टॅक्स विभागाचे जॅाईंट कमिशनर हर्षद सदाशिव आराधी यांनी भगवाने शंकराचे सोंग नाचवले. या सोंगात त्यांचे समवेत त्यांचे बंधु डॅा.ओंकार, शुभम उल्हास आराधी व सोमनाथ आचारी हे होते. हर्षद हे जॅाईंट कमिशनर, डॅा. ओंकार हे एमबीबीएस व शुभम हे अॅडव्होकेट असूनही त्यांनी सोंग नाचवत संस्कृतीशी नाळ कायम राखली. सोंग बघण्यासाठी मिरवणुक मार्गाच्या दोन्ही बाजुंनी नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. रविवारी पहाटे देवीच्या मिरवणूकीने बोहाड्याची सांगता करण्यात आली. देवीच्या सोंगाचा मान येथील परदेशी घराण्याकडे आहे. प्रसिध्द किराणा व्यापारी मोहनसिंग अर्थात त्र्यंबक परदेशी यांचे चिरंजीव वैभव याने भक्तीपुर्ण वातावरणात देविचे सोंग नाचवले.
देवी मिरवणूकीच्या मार्गावर नागरीकांनी सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी सुवाशिनिंनी देवीची ओटी भरुन औक्षण केले. अनेकांनी देवीला नवस केले. यावेळी या परदेशी घराण्यातील मोहनसिंह, भगवान सिंह, राम सिंह, शाम सिंह, प्रताप सिंह, अनिल सिंह, किरण सिंह, मनोज सिंह, हर्ष सिंह यांचे सह सर्व परदेशी परिवार, महिलावर्ग, गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत वसंतोत्सवाच्या आयोजनामुळे गेल्या दोन वर्षातील कडु आठवणी विसण्यास मदत झाली, दोन वर्षांची मरगळ दुर होण्यास मदत होवुन गावात चैतन्याचे वातावरण तयार झाले.