रविंद्र धारणे
त्र्यंबकेश्वर – महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकराचा उपासणेचा दिवस, यादिवशी भगवान शिवशंकराची आराधना केल्यास विशेष पुण्यप्राप्ती व फलप्राप्ती प्राप्त होते, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. पुणे येथील युवराज तेली ट्रस्टच्या वतीने मंदिरात प्रवेश करणार्या प्रत्येक भाविकांना मोफत N 95 मास्कचे व पाणी बॅाटलचे, ग्लुकॅान डी वाटप करण्यात आले. तसेच अॅम्ब्युलन्ससह आठ डॅाक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती.
पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पूर्व दरवाजा बाहेर मंडप टाकण्यात आला होता. मंडपातील दर्शनार्थी भाविकांच्या रांगा पूर्णपणे भरून मंडपाच्या बाहेर थेट उदासीन आखाडयापर्यंत गेली होती. मंदिराच्या उत्तर दरवाजाने सशुल्क दर्शनबारी होती. तर स्थानिक नागरीकांना नेमून दिलेल्या वेळेत उत्तर दरवाजातून दर्शनासाठी सोडण्यात येत होते. सर्व भाविकांना दर्शन करून उत्तर दरवाजातून बाहेर सोडण्यात येत होते. दर्शनबारी मधून बम बम भोलेचा जयघोष सुरू होता. मागील वर्षीच्या मानाने यावर्षी कोरोनाचे निर्बंध व दहशत बरीच कमी झाल्याने यावर्षी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती.
पर्वकाळा निमित्त महादेवाला वाहण्यासाठी बेल, बेलफळ, फुलं, कवठं, याचबरोबर उपवासाचे पदार्थ खजुर, केळी, द्राक्ष आदींची बाजारपेठेत मोठया प्रमाणावर आवक झाली होती. तर ऊसाच्या रसाचीही तडाखेबंद विक्री झाली. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने दोन दिवस सायंकाळच्या सुमारास विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर आज सकाळी अकरा वाजता विश्वकल्याणार्थ संस्थानच्या वतीने लघुरुद्र अभिषेक संपन्न करण्यात आला.
अवर्णनीय पालखी सोहळा
दुपारी ठिक ३ वाजता भगवान त्र्यंबकराजाच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. वर्षभरातुन फक्त एकच दिवस म्हणजे महाशिवरात्रीस निघणारी पालखी पाचआळी परिसरातून नेण्यात येते. यामुळे संपुर्ण पाचआळी परिसरात अतिशय सुंदर असे फुलांचे गालीचे तयार करण्यात आले होते. श्री भगवान परशुराम मंदिरा समोर भगवान त्र्यंबकेश्वराची आरती करण्यात आली. नंतर देवस्थानचे पुर्वसंस्थानीक जोगळेकर यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांनी पालखीचे स्वागत व पूजा केली. ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर महिलांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे औक्षण करुन श्रीफळ, कवठाचे फळ अर्पण केले. त्यानंतर श्री बल्लाळेश्वर मंदिर मार्गे पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. तेथे एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. स्नान आटोपून पालखी पुन्हा मंदिरात आणण्यात आली. बॅण्ड पथक तसेच दक्षिणात्य ढोल पथक असा अत्यंत भावपुर्ण सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळयामध्ये देवस्थान ट्रस्टचे चेअरमन न्या. विकास कुलकर्णी, सचिव संजय जाधव, विश्वस्त प्रशांत गायधनी, अॅड. पंकज भुतडा, दिलीप तुंगार, डॅा. सत्यप्रिय शुक्ल, भुषण अडसरे, संतोष कदम, तृप्ती धारणे, संस्थानचे अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, रशवी जाधव, विजय गंगापुत्र यांचेसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
मंदिराचे विलोभनीय दृश्य
महाशिवरात्र पर्वकाळा निमित्त ञ्यंबकेश्वर मंदिरास सुंदर विद्युत रोषणाई केली होती. त्याचे विलोभनिय दृष्य पाहण्यासाठी भाविक आवर्जुन वेळ काढत होते. अनेक भाविकांनी येथे सेल्फीचा आनंद लुटला. सायंकाळी
सोमवार २८ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत ओम नटराज अकॅडमी तर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांनी केले होते. १ मार्च रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत चंद्रशेखर शुक्ल (कीर्तनकार व भागवतकार) संकेतशास्त्री दीक्षित (भागवतकार) व महेंद्र तथा बाळासाहेब चांदवडकर (कीर्तनकार) यांचा श्रीत्र्यंबक माहात्म्य भक्ती संध्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
२ मार्च सायंकाळी ६ ते रात्री ७.३० पर्यंत नाशिक प्रसिध्द कलाकारी संगीत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची व त्यांचे सहकारी यांचा एक सुरेल ‘स्वरयात्रा’ हा कार्यक्रम संध्याकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत पं.जसराज यांचे शिष्य पं.श्रीप्रसाद दुसाने यांचा शास्त्रीय गायन द्वारे शिवस्तुती कार्यक्रम होईल. महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री विश्वकल्याणार्थ भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापुजा, सप्त धान्य पुजा व मंदिराच्या प्रांगणात पालखी सोहळा संपन्न होईल.