त्र्यंबकेश्वर – त्रिंबक नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सायली हर्षल शिखरे यांची निवड करण्यात आली आहे. त्रिंबक नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. रोटेशन पध्दतीने उपनगराध्यक्ष समीर पाटणकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक, नगरसेविका, आदींसह समर्थक उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका सायली शिखरे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची निवड करण्यात आली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले. यानंतर ढोलताशांच्या गजरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक माधवी भुजंग, कैलाश चोथे, समीर पाटणकर, स्वप्निल तथा पप्पू शेलार, सागर उजे, शीतल उगले, दीपक लोणारी, शिल्पा रामायणे, अनिता बागूल, अशोक घागरे, संगिता भांगरे, भारती बदादे यांचेसह ज्येष्ठ नेते विजय शिखरे, अविनाश शिखरे माजी तालुकाध्यक्ष संजय शिखरे, माधव भुजंग, सुरेश गंगापुत्र, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, युवा नेते हर्षल शिखरे, उदय दिक्षित, आदींसह समर्थक उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर पर्यटन व धार्मिक नगरी असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना योग्य त्या सुविधा देणे हे त्रंबक नगर परिषदेच्या प्रथम कर्तव्य असून त्यादृष्टीने त्रंबकेश्वर नगरीत आरोग्य,स्वच्छता, पाणीपुरवठा व दिवाबत्ती सुविधा देऊन त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांना जास्तीत जास्त व्यवसायिकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू. असे मनोगत नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सायली हर्षल शिखरे यांनी व्यक्त केले.