त्र्यंबकेश्वर – श्रावणाचा अखेरचा दिवस, पिठोरी अमावस्या अर्थात पोळा सण त्र्यंबकेश्वर व परिसरात उत्साहात संपन्न करण्यात आला. श्रावणातील शेवटचा सोमवार व सोमवती अमावस्या निमित्त भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. मात्र अद्यापही मंदिरे बंद असल्याने भाविकांना संपूर्ण श्रावण महिनाभर भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनापासुन वंचित रहावे लागुन शिखर दर्शनावरच समाधान मानावे लागले. मात्र रविवारी व सोमवारी बर्याच भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षणेचा आनंद घेतला.
मागीलवर्षी नागरीकांमध्ये कोरोनाची भिती जास्त असल्याने इतर सणांप्रमाणे शेतकर्यांचा आवडता सण दहशतीखाली व साधेपणाने साजरा केला गेला. मात्र यावर्षी लाॅकडाउन मधून बरीचशी सुट मिळाल्याने बळीराजामध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळीच आपापल्या सर्जाराजाला नदीनाल्यावर नेउन त्यांना स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. नंतर बैलांच्या अंगावर विविध प्रकारचे ठसे उमटवुन त्यांना रंगविण्यात आले. शिंगाना रंग लावुन बेगड लावण्यात आले. गळ्यात घुंगुरमाळा घालुन अंगावर झुल पांघरण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे बैल मिरवण्यात येतात. सोमवार असल्याने पालखी सोहळ्या नंतर बैल मिरवणुक होत असते. दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला.
सोमवार पालखीचे वंशपरंपरागत पुजक वेदमुर्ती नारायण फडके यांनी पुजाभिषेक केला तर शागिर्द म्हणुन अनंता दिघे, समिर दिघे, मंगेश दिघे व कुणाल लोहगावकर यांनी सेवा दिली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश विकास कुलकर्णी, विश्वस्त प्रशांत गायधनी, भुषण अडसरे, संतोष कदम, अॅड. पंकज भुतडा, यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाविक सामील झाले होते. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण चौधरी यांच्या माध्यमातुन देवमाणूस मालिकेतील मंजुळा यांची भूमिका साकारणारी प्रतीक्षा जाधव, याच मालिकेतील संजूची भुमिका साकारणारे सागर कुऱ्हाडे, तसेच कारभारी लय भारी मालिकेतील शोना भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मी पाटील, बिग बाॅस फेम तसेच सोशल मिडीया वरील तरुणाईचा चाहता हिंदुस्तानी भाई अर्थात विकास पाठक यांनी देखील आज येथे हजेरी लावली. पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देवस्थान ट्रस्टकडे स्वत:चे बैल नाहीत त्यामुळे विष्णुपंत गाजरे यांचे बैलांना दरवर्षी देवस्थान मान देते. त्यानुसार पालखी सोहळा झाल्यावर वाजंत्रीच्या तालावर विष्णुपंत गाजरे आणी प्रदिप अर्थात दादु गाजरे यांनी सर्वप्रथम देवस्शानच्या वतीने मानाचे बैल मिरवले. देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयासमोर बैलांची पूजा करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर गावातील इतर नागरीकांच्या बैलांच्या सवाद्य मिरवणुका निघाल्या. बैलांना श्रीहनुमानाच्या दर्शनासाठी नेण्यात आले. काही बैल मालकांनी मारुतीराया समोर बैलांना पुढील दोन पाय टेकवुन देवाला नमस्कार करायला लावला. याला सलामी देणे असे म्हटले जाते. मिरवणूक घरी गेल्यावर सुवाशिनींनी बैलांना औक्षण करुन पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांचेकडे शेती नाही त्यांनी मातीच्या बैलाची पूजा केली. देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवुन ठिकठिकाणी पुरणपोळीची पंगत जमली.