रविंद्र धारणे
त्र्यंबकेश्वर – वसंतोत्सव अर्थात बोहाडा ही ग्रामीण भागातील एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा वारसा संक्रमित होत असल्याने आजतागायत ही संस्कृती टिकुन आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने याचा खर्च आवाक्याच्या बाहेर जात आहे. पैशांअभावी ही परंपरा खंडीत होऊ नये अन्यथा ही परंपरा लयास जाईल, पुढच्या पिढीला याची माहिती राहणार नाही, याकरता स्थानिक सधन नागरीक, वित्तिय संस्था, धर्मदाय संस्था, धार्मिक देवस्थान ट्रस्ट आदींनी या लोकोत्सवास स्वत:हून वर्गणी द्यावी. असे आवाहन वसंतोत्सव समितीचे कोषाध्यक्ष महेंद्र तथा बाळासाहेब चांदवडकर यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.
मृत्युंजय बहूउद्देशीय सामजिक संस्था, त्र्यंबकेश्वरचा राजा मित्र मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहभागाने विश्वकल्याणार्थ येथे वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मार्च, १ आणि २ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेपासून पारंपरिक सोंगांची मिरवणूक निघणार आहे. २ एप्रिल अर्थात गुढी पाडव्याच्या दिवशी बोहाड्याचा मुख्य दिवस असून त्या दिवशी प्रशासनाने परवानगी दिल्यास रात्रभर सोंगे मिरवले जातील. या कार्यक्रमाचे नियोजन, रुपरेषा आदि बाबींची माहिती देण्याकरीता कौडीण्याश्रम येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव समिती अध्यक्ष मंगेश धारणे, कोषाध्यक्ष बाळासाहेब चांदवडकर, मार्गदर्शक बाळासाहेब पाचोरकर, प्रसिध्दी प्रमुख मनोज खैरनार, मिलिंद धारणे, सनी ऊगले, देवीचे मुख्य सोंग मिरवण्याचा मान असणारे परदेशी परिवारातील भगवानसिंह परदेशी, रामसिंह परदेशी, मोहनसिंह तथा त्र्यंबक परदेशी, समिती सदस्य जयदिप शिखरे, रतीश जोशी, पत्रकार मंडळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बोहाड्या मागील ऊद्देश, परंपरा, याअंतर्गत काढण्यात येणारी पौराणिक सोंगे, त्यांच्या मिरवणुकीचा क्रम, आदीं बाबद मंगेश धारणे यांनी सविस्तर माहिती दिली. सोंगांचे वेशभुषा, टोप, आदिंविषयी बाळासाहेब पाचोरकर यांनी माहिती दिली. बोहाड्याचा इतिहास, विविध भागातील त्यांची नावे, बोहाड्याचाच प्रकार असलेल्या जगभरातील लोक परंपरा आदीची माहिती बोहाड्याचे अभ्यासक यांनी करुन दिली. देवीच्या मुख्य सोंगाची माहिती भगवानसिंह परदेशी यांनी दिली. तर या लोकोत्सवासाठी येणार्या खर्चाची माहिती करुन देतांनाच कोषाध्यक्ष बाळासाहेब चांदवडकर यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले.
—