त्र्यंबकेश्वर – वसंतोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व गुढी पाडव्याचे औचित्य साधून ३१ मार्च पासून तीन दिवस त्र्यंबकेश्वरला बोहाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मृत्युंजय प्रतिष्ठान तथा बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या तीन दिवसीय बोहड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, लक्ष्मीकांत थेटे, मंगेश धारणे, विलास वाडेकर, बाळासाहेब चांदवडकर, मिलींद धारणे, गिरीश जोशी, बाळासाहेब पाचोरकर, जयंत शिखरे, गोविंदराव मुळे, पंकज लोंढे, मनोज खैरनार, जयदिप शिखरे, आदी मान्यवरांचा या समितीत समावेश आहे. आजच्या पहिल्या दिवशी श्रीगणेशाची पुजा आरती करण्यात येऊन हा बोहडा यशस्वी होऊ दे यासाठी ही श्री गणेश चरणी प्रार्थना करण्यात आली.
भालदार चोपदार घेऊन गावातील प्रमुख निमंत्रक तथा पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष जयंत शिखरे यांनी गावात फिरुन ग्रामस्थांना बोहाड्याला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर निसर्गाचे ऋणनिर्देश म्हणुन झाडांचा पाला पाचोळा घेऊन लहान मुले डगळ्यांच्या भूमिकेत नाचत होते. नाचण्याचा क्रम कुशावर्तापासुन लक्ष्मीनारायण चौका पर्यंत असा होता. दरम्यान श्रीगणेश व शारदा यांचे सोंग नाचत मिरवण्यात आले. त्यानंतर खंडेराव, म्हाळसा, वाघे मुरळ्या काढण्यात आल्या. प्रत्येक सोंग मिरवणुकीला अर्धा तास देण्यात आला होता. त्यानंतर कच्छ मच्छ, श्रीकृष्ण परशुराम युध्द त्यानंतर भस्मासुर मोहिनी, चारण बालम तसेच मारुती जम्बु माळी युध्द, त्राटीका व श्रीराम लक्ष्मण युध्द, वराहवतार, वाली सुग्रीव युध्द, एकादशी व राक्षस युध्द, होडी, द्वादशी, श्रावणबाळ, शंकर त्रिपुरासूर युध्द, खेकडा भुताळी, लहरी राजा, पांडव ताटी, कौरव ताटी, दुंदुभी, इंद्रजित लक्ष्मण युध्द, रावण व राम लक्ष्मण युध्द अशा चोवीस सोंगांचे सादरीकरण आज पहिल्या दिवशी मंडळा तर्फे करण्यात आले. हे सर्व सादरीकरण अगदी नियोजनबद्ध पध्दतीने करण्यात आले. कोरोना कोव्हीडची भिती जनतेच्या मनातून जणु हद्दपार झाली आहे. कारण जेष्ठ नागरिकांचे तीन तीन डोस (बुस्टरडोससह) झाले आहेत. तर युवा पिढीनेही दोन डोस झाल्याने तशी काही भितीने कारण नव्हते. दरम्यान वाद विवाद किंवा अन्य काही गैरप्रकार घडु नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. सोंग नाचविण्यात राजमार्ग झाडून स्वच्छ करण्यात आला होता. संपुर्ण रस्त्यावर लोकांनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. विज गायब झाल्यास जनरेटर सज्ज ठेवण्यात आले होते. सोंग मार्गावर सुचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते.