त्र्यंबकेश्वर – थोर सामाजिक कार्यकर्ते तथा माहेश्वरी समाजाचे जेष्ठ नेते व त्र्यंबक नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मांगिलालजी रामरतन सारडा यांचे आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७७ वर्षांचे होते. त्र्यंबकेश्वरच्या जडणघडणीत व विकासात्मक कामात कै.यादवराव तुंगार, कै. गिरीश दीक्षित, कै. सुरेश पाचोरकर, कै.रमेशचंद्र थेटे यांच्या बरोबर त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्र्यंबकेश्वर माहेश्वरी समाजाचे ते अध्यक्ष होतेच पण दोन वेळा नगरसेवक होते. सन १९९१ ते १९९३ या काळात नगराध्यक्ष होते.
सन १९९१/१९९२ या काळात सिंहस्थ कुंभमेळा होता. त्यामुळे सिंहस्थ नियोजन त्या काळात त्यांनी अन्य सहका-यांच्या सहकार्याने पार पाडले. त्यांनी २५ वर्षापुर्वी ११ ऑगस्ट १९९४ रोजी कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज ही पतसंस्था त्र्यंबकेश्वर मधील अग्रणी पतसंस्था आहे. सन २०२१ हे वर्ष संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. लाॅकडाउन संपल्यानंतर ते व त्यांचे सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करणार होते. दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने झडप घातली. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ५ मुली, ३ भाऊ, बहिणी, सुन, नातु असा मोठा परिवार आहे.