त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर हे एक धार्मिक तिर्थक्षेत्र तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण म्हणुन जगप्रसिध्द आहे. द्वादश ज्योतिर्लिंगापैकी दहावे ज्योतिर्लिंगांच ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. पौराणिक मान्यतेनुसार त्र्यंबकेश्वर नगरी देवदेवतांप्रमाणेच विविध संतांचीही तपोभुमि मानली जाते. शिवाची नगरी असल्याने शिवा बरोबरच शक्तीचाही येथे वास आहे. माता पार्वतीच्या रुपातच गंगाद्वार पर्वतावरील कोलांबिका देवी आणी निलपर्वता वरील निलांबिका देवीचे अधिष्ठान आहे.
निलांबिका देवीजी पौराणिक कथा मातापुर अर्थात माहुर निवासिनी श्री रेणुकामातेच्या कथेशी अगदी मिळतीजुळती आहे. यामागील पौराणिक कथा अशी की, तिर्थाटन करत करत भगवान परशुराम श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तपश्चर्या करीता आले. बराच कालावधी लोटल्यानंतर त्यांना मातेच्या भेटीची आस लागली. मातेचा विरह असह्य झाल्याने त्यांनी निलपर्वतावर मातेचा धावा सुरु केला. मातेने त्यांना दृष्टांत दिला की, मी पुर्णपणे भूगर्भातुन वर येईपर्यंत तु नेत्र उघडायचे नाहीत. त्याप्रमाणे भगवान परशुराम डोळे मिटुन ध्यानस्थ बसले आणी माता भूगर्भातुन वर येऊ लागली. मातेचा विरह असह्य झाल्यामुळे त्यांनी मातेला बघण्यासाठी काही क्षणानंतर डोळे उघडले मात्र तोपर्यंत मातेचं फक्त गळ्यापर्यंतचे शरीर वर आले होते. मातेचे पूर्ण शरीर वर यायच्या आतच भगवान परशुरामांनी नेत्र उघडल्यामुळे रेणुकामाता अर्थात निलांबिकेचा गळ्या पर्यंतचाच मुखवटा आज नजरेस पडतो.
नवसाला पावणारी देवी म्हणुन आज निलांबिका देवीची ख्याती आहे. येथील दशपुत्रे घराण्याकडे देवीच्या नित्य पुजेचे अधिकार असुन वेदमुर्ती सतिश दशपुत्रे मातेची नित्य पुजा व सेवा करतात. शेजारीच श्री मटम्बा मातेचे मंदिर आहे. श्री मटम्बा देवी नाशिकच्या शौचे, क्षेमकल्याणी परिवारासह अनेकांची कुलदेवता आहे. निलपर्वतावर श्रीपंचायती भैरव अर्थात जुना आखाडा आहे. नागा साधुंचा हा आखाडा आहे. या आखाड्याची इष्ट देवता भगवान दत्तात्रयांच्या येथे पादुका असुन येथे सुंदर असे दत्तमंदिर आहे. या मंदिरामागेच निलकंठेश्वर महादेवाचे मंदिर असुन आत भगवान परशुरामांची मुर्ती आहे. या महादेवाची स्थापना भगवान परशुरामांनीच केल्याची आख्यायिका आहे. हे महादेवाचे मंदिर जवळपास साडेआठशे वर्षांपुर्वीचे होते मात्र मागील कुंभमेळ्यात या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला. पुर्वी येथे जाण्यासाठी दोनशे दगडी पायर्या होत्या तेव्हा जाउन येण्यासाठी जेमतेम अर्धातास लागायचा. आता पायर्यां बरोबरच दोनही बाजुंनी डांबरी रस्ते झाल्याने थेट वाहनाद्वारेही वर जाता येते. पायथ्याशी श्री खंडेराव महाराज व श्री रेणुका देवीचे मंदिर आहे. निसर्गरम्य व शांत परिसर असल्याने रोज अनेक भाविक दर्शनाला जातात. तसेच शरीराला नित्य व्यायाम हवा म्हणुन अनेक स्थानिक नागरीक रोज येथे फिरायलाही जातात. चैत्र महिन्यात व शारदीय नवरात्रामध्ये भाविकांची विशेष गर्दी असते.