त्र्यंबकेश्वर – प्रतीवर्षी निवृत्तिनाथांची पालखी जेष्ठ पौर्णिमेस पंढरपूरकडे हजारो वारकरी भाविकांसमवेत प्रस्थान करते. मजल दरमजल करीत २६ दिवसात ही पालखी पंढरपूरला पोहचते. असा हा भक्तीपूर्ण सोहळा साजरा होत असतो. परंतु, याही वेळी कोरोनाच्या महामारीने सगळ्यांवरच बंधने आली आहेत. शासनाने पायी पालखी वारीस बंदी घातली असल्या कारणाने शासन निर्देशानुसार आज भर पावसात शिवशाही बसने नाथांच्या पादुकांनी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
प्रस्थानापूर्वी पहाटे समाधीची नित्य पूजा, झाल्यावर प्रस्थानाच्या अभंगासह धन्य धन्य निवृत्तिदेवा हा अभंग म्हणण्यात आला. श्रींच्या चांदिच्या पादुका व प्रतिमा समाधीजवळ ठेऊन आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष केल्यावर नाथांची प्रतिमा व पादुका भजन किर्तन करीत पालखी पहाटे साडे पाच वाजता मंदिराबाहेर आणण्यात आली. येथून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पहाटे सहा वाजता पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. परंपरेनुसार नगरीचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्निक पादुकांचे पूजन करुन पादुकांना स्नान घातले व आरती केली. तेथून ञ्यंबकेश्वर मंदिराचे समोर अभंग सेवा करुन श्रींच्या पादुकांसह पंढरपुरला जाणारे वारकरी व प्रशासक दोन शिवशाही बस मध्ये बसले.
दोन्ही शिवशाही बसेस फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. बसेस रस्त्यात कोठेही थांबणार नसून थेट वाखारीला थांबणार असुन तेथुन पुढे दिड कि.मी. पायी दिंडी चालणार आहे, असे नियोजन आहे. दरवर्षी ४८ दिवसांचा पालखी सोहळा असतो यावर्षी अवघ्या सहा दिवसात आटोपणार आहे. दशमी दिनांक १९ जुलै रोजी प्रस्थान, एकादशी दिनांक २० जुलै रोजी देवदर्शन, द्वादशी दिनांक २१ जुलै रोजी एकादशीचा ऊपवास सोडून दि. २४ रोजी परतीचा प्रवास सुरु होईल, असा सोहळा होत आहे.
या सोहळयात शासन निर्देशानुसार ४० व्यक्तींनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे आहे. त्यामध्ये ३२ मानकरी व वारकरी आणि ८ मध्ये प्रशासक, वैद्यकीय पथक व पोलीस यांचा समावेश आहे. सर्व व्यक्तींना कोवीड 19 चाचणी करून घ्यावी लागली आहे. तसेच त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रशासक मंडळाचे प्रमुख तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, नगरपरिषद मुख्याधिकारी संजय जाधव, पो.नि. संदिप रणदिवे, अॅड. भाऊसाहेब गंभिरे आदिंसह प्रांताधिकारी तेजस चव्हाण, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, तहसिलदार दिपक गिरासे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सच्चितानंद गोसावी, रश्मी गोसावी, ज्ञानेश्वरी धारणे, मानकरी, वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
पालखी सोबत या वारकर्यांना मिळाली संधी
सर्वश्री हभप. मानकरी मोहन महाराज बेलापुरकर, बाळकृष्ण डावरे, दिंडी प्रतिनिधी म्हणुन जयंत महाराज गोसावी, रविंद्र काकड, सोपान महाराज गोळेसर, सोपानकाका हिरवे, मोहन जाधव, सुर्यभान कडलग, भिमराज कांदळकर, खुशाल चवंडगीर, गंगाधर काकड, राजाराम गाडे, कृष्णा कमानकर, संतोष सोमवंशी, भगीरथ काळे, नारायण पाटील, गोरख पाटील, शरद मत्सागर, कारभारी पोटे, संपत थेटे, उत्तम आडके, प्रकाश केदार, वसंत गटकळ, बापुसाहेब मोरे, पांडुरंग जाधव, सतीश मोरे, रमेश खुळे, पुजारी सच्चितानंद गोसावी, रश्मी गोसावी, ज्ञानेश्वरी धारणे, चोपदार निवृत्ती मेमाणे, झेंडेकरी ज्ञानेश्वर दाते, रामदास थेटे, विणेकरी अर्जुन गाढवे, संस्थानचे कर्मचारी गंगाराम झोले, संदिप मुळाणे, धर्मदाय खात्याचे निरीक्षक पंडीतराव झाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, संस्थानचे प्रशासक अॅड. भाऊसाहेब गंभीरे, सहायक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे यांचा समावेश आहे. दोन शिवशाही बसचे सारथ्य करण्याचा मान शशिकांत ढेपले, नितिन जाधव, प्रशांत पाटील व प्रमोद भुजबळ यांना मिळाला.