त्र्यंबकेश्वर – श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि त्यातही भगवान शिवशंकराचा वार सोमवार मात्र कोरोनामुळे राज्यातील धार्मिक स्थळांबरोबरच आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर बंद असल्याने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांना कळस दर्शनावर समाधान मानावे लागले. भाविकांच्या मान्यतेनुसार भगवान शिवशंकराच्या उपासनेच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ झाला. श्रावण महिनाभर असंख्य भाविक देवदर्शन, जप, तप, विविध अनुष्ठाण करतात. त्यामुळे या महिन्याचा पहिलाच दिवस सोमवारचा असल्याने धार्मिक स्थळे बंद असली तरीही असंख्य भाविकांनी आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गर्दी केली होती. मात्र कोरोनामुळे भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर बंद असल्याने त्यातच मंदिरचौक परिसरात बॅरेकेडींग केल्याने भाविकांना पन्नास शंभर फुटावरुनच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्यावे लागले. तसेच अनेकांनी शिखर दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जुना महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती तर अनेक भाविकांनी ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेलाही अनन्य साधारण महत्व आहे मात्र मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी शासनाने प्रदक्षिणेला बंदी घातल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. अगदी मोजक्याच भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. नगरीचे सर्व अर्थकारण हे मंदिर व येथे होणारे धार्मिक विधी यावरच अवलंबुन आहे. मात्र मध्यंतरीचा काही कालावधी वगळता गेले दीड वर्षापासून दोन्ही बंद असल्याने नगरीचे अर्थकारण पार कोलडले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघासह स्थानिक नागरीकांनी केली आहे.
दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली . या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, भुषण अडसरे, अॅड़. पंकज भुतडा , संतोष कदम, तृप्ती धारणे यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, असंख्य भाविक सामील झाले होते. पो.नि. संदिप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पो.उ.नि. अश्विनी टिळे व त्यांचे सहकार्यांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.