त्र्यंबकेश्वर – श्रावण महिन्याचा पंधरवाडा उलटुन गेला तरीही राज्यातील धार्मिक स्थळांप्रमाणे भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर अद्यापही बंद असल्याने दरवर्षी शिवभक्तांच्या गर्दीचा उच्चांक असलेला श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारीही शिवभक्तांना भगवान त्र्यंबकराजाच्या शिखर दर्शनावरच समाधान मानावे लागले. प्रत्येक वर्षी तिसर्या श्रावणी सोमवारचं नियोजन थेट जिल्हा पातळीवरुन होते. जवळपास दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वरला येऊन ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतात. भाविकांना मुलभुत सोयीसुविधा देण्यासाठी शासनाच्या विविध खातेप्रमुखांच्या नियोजन बैठका होतात. परिवहन महामंडळाच्या वतीने तिनशे ते चारशे बसेस सोडण्यात येतात. सोमवारच्या पूर्व संध्येलाच हजारो भाविक येऊन प्रदक्षिणेचा मार्ग धरतात. हा भाविकांचा ओघ सोमवार दुपार पर्यंत सुरु असतो. भाविकांची गर्दिच एवढी असते की, संपुर्ण ब्रह्मगिरीला एक अखंड मानवी साखळी तयार होते. विविध दानशुर भाविक, संस्था यांच्यावतीने भाविकांना मोफत साबुदाना खिचडी, साबुदाना वडे, फळं, चहापाण्याचे वाटप करतात. त्याच बरोबर विविध पदार्थ, वस्तुंच्या विक्रीद्वारे अनेकांना रोजगारही मिळतो. एक दिवसामध्ये नगरीत लाखो रुपयांचं अर्थकारण होते.
मात्र याहीवर्षी कोरोनामुळे अद्यापही भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर व कुशावर्त तिर्थ बंद आहेत. तसेच येणार्या लाखो भाविकांमुळे प्रदक्षिणा मार्गा वरील गावांमध्ये कोरोना वाढण्याचा धोका लक्षात घेउन याहीवर्षी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवरही बंदी घालण्यात आली आहे. भाविक प्रदक्षिणेला जाऊ नये म्हणून आधीच्या दोन सोमवार प्रमाणेच रविवारी रात्री पासूनच ठिकठिकाणी नाकेबंदी व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. तरीही पोलीसांची नजर चुकवुन आडवाटेने भाविक प्रदक्षणेला गेले. सोमवारी प्रदक्षणेला बंदी असल्याने शिवभक्त इतर दिवशी प्रदक्षिणेला जातात. त्र्यंबकेश्वराच्या मंदिर महाद्वाराच्या पायरी जवळ भाविक थांबून गर्दी होऊ नये म्हणून मंदिराच्या बंद दरवाजासमोर व कुशावर्त तिर्थावर भाविक जाऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणी बॅरेकेडींग लावुन पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या व दुसर्या सोमवार प्रमाणे तिसरा सोमवारही भाविकांना शिखर दर्शनावरच समाधान मानावे लागले.
दुपारी तिन वाजता दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला. सोमवार पालखीचे वंशपरंपरागत पुजक वेदमुर्ती नारायण फडके यांनी पुजा केली तर शागिर्द म्हणुन समिर दिघे, मंगेश दिघे व यज्ञेश कावनईकर यांनी सेवा दिली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली . या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त भुषण अडसरे, संतोष कदम, अॅड. पंकज भुतडा, तृप्ती धारणे यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी सामील झाले होते. पोलीसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.