त्र्यंबकेश्वर – सोमवारी पारशी नववर्ष दिनाची शासकीय सुटी असल्याने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील दुसर्या सोमवारी चांगलीच गर्दी केली होती. दुसरा शनिवार, रविवार आणी स्वातंत्र्य दिन अशा लागुन आलेल्या सुट्यांमुळे या दोन दिवसात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली होती. कोरोनाच्या लॅाकडाउनमधून बर्याच प्रमाणात सुट मिळाली तरी राज्यातील धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर बंद असल्याने आलेल्या भाविकांना याही सोमवारी कळस दर्शनावर समाधान मानावे लागले.
भाविकांच्या मान्यतेनुसार भगवान शिवशंकराच्या उपासनेच्या दृष्टीने श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिनाभर असंख्य भाविक देवदर्शन, जप, तप, विविध अनुष्ठाण करतात. त्यामुळे या असंख्य शिवभक्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गर्दि करत असतात. कोरोनामुळे भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर बंद आहे. त्यातच आज मंदिर महाद्वारासमोर बॅरेकेडींग करुन भाविकांना मंदिराच्या दरवाजाजवळ येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांना दूरुनच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शनावर समाधान मानावे लागले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या जुना महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तर अनेक भाविकांनी ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेलाही अनन्य साधारण महत्व आहे. सोमवार साठी शासनाने प्रदक्षिणेला बंदी घातली असली तरीही अनेक भाविक आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला गेले.
दुपारी ३ वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. पालखी जवळ भाविकांनी गर्दि करु नये यासाठी देवस्थानच्या कर्मचार्यांनी दोरी लावत पालखी सभोवती साखळी तयार केली होती. पालखी मार्गावरील रहिवाशांनी पालखी मार्गावर सडा टाकुन रांगोळ्या काढल्या होत्या. भाविकांना गर्भगृहातील पिंडीचे दर्शन झाले नसले तरी पालखी सोहळ्याप्रसंगी भगवान त्र्यंबकराजाच्या सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घडले. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. असंख्य भाविकांनी पालखी सोहळ्याचा लाभ घेतला. कुशावर्त तिर्थावर एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली . या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, भुषण अडसरे, अॅड़. पंकज भुतडा , संतोष कदम यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, असंख्य भाविक सामील झाले होते. पो.नि. संदिप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पो.उ.नि. अश्विनी टिळे यांचेसह ९ अधिकारी व ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते.