त्र्यंबकेश्वर – प्रदक्षिणा मार्गातील ब्रह्मगिरी वर अवैध उत्खनन करण्यात आलेल्या धोकादायक ब्रह्नगिरीच्या ठिकाणी हिरामण खोसकर यांनी भेट दिली. यावेळी धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रम्हगिरीच्या उत्खनननाने भविष्यात निर्माण झालेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत महसूल व वन खात्याच्या बेजबाबदार पणा विषयी नाराजी व्यक्त केली. काही दिवसापूर्वीच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी झालेल्या उत्खननाने डोंगर वस्ती असलेल्या सुपलीमेट मेट, गंगाव्दार परिसरात दरड कोसळत होती. याच ठिकाणी माळीण परिस्थिती सारखा धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेवून आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली.
भावी काळात उपाययोजनांबाबत ग्रामस्थ आणि तज्ञ लोकांसोबत पायी चालत भेट दिली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे महसूल व वने खात्याच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी तसेच सुपलीच्या मेटच्या लोकांचा स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. ब्रह्मगिरीच्या डोंगर कडेला ग्रुटींगसह अन्य उपाययोजना करावी अशी सकारात्मक चर्चा होऊन प्रशासनास तात्काळ सुचना देण्यात आल्या. यावेळी महसूल विभाग नायब तहसीलदार सतीश निकम, तलाठी संतोष जोशी उपस्थित होते. सुपलीची मेट भागात दरड कोसळणे सारखा प्रसंग येवू नये. तेथील लोकवस्तीचे स्थलांतर करावे असा सूर आमदार खोसकर यांचे बोलण्यातून दिसला. विशेष म्हणजे वन खात्याचे अधिकारी मात्र दिसले नाही. दरम्यान सुपलीचे मेट येथील युवक झोले, बदादे, गमे यांनी आमदाराकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष दिले नाही अशा तक्रारी मांडल्या.
पर्यावरण मंत्र्याची ग्रामस्थासह भेट घेणार
धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रह्मगिरीला बिल्डर लाॅबीकडून पोखरले जात असतांना महसुल व वन खाते यांनी काना डोळा करून गोलमाल केले. काही दिवसांपुर्वी दरड कोसळण्याचा प्रकार झाल्याने त्याने शेकडो लोकांचे जीवन धोक्यात घातले आहे. बिल्डरसह महसुल व वन खात्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच सुपलीची मेटच्या स्थलातरा संबंधी पर्यावरण मंत्र्याची बुधवारी ग्रामस्थासह भेट घेऊन मार्ग काढला जाईल.
– हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर