त्र्यंबकेश्वर – गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वरला पावसाची संततधार असून बुधवारी दिवसभरात सायंकाळी सहा वाजे पर्यंत ११४ मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली आहे तर २४ तासात २२४ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. संततधार पावसामुळे ब्रह्मगिरी, अंजंनेरी पर्वतावरून असंख्य धबधबे खाली कोसळत असल्याचे दृष्य अनेकांनी आपल्या मोबाईल, कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवले. ब्रह्मगिरी, गंगाद्वारच्या पायर्यांवरुन वेगाने पाणी वहात होते. दुपारी दोनच्या सुमारास तेली गल्ली, गोकुळदास लेन, मेनरोड, कुशावर्त परिसरात सौम्य पुर आला होता. मात्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा या परिसरात पूर आला. परिसरातील दुकानदार, रहिवासी यांना या गोष्टीची जाणीव असल्याने व ते सावध असल्याने काही हानी झाली नाही. जवळापास दोन तास या भागात पूर होता. काही घरांमध्ये पाणी शिरले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अमृतकुंभ धर्मशाळे समोर, नगरपरिषद कार्यालयात समोर पाणीच पाणी चहुकडे… अशी परिस्थिती झाली होती. त्र्यंबकवासीयांना हा पूर आनंददायी वाटतो. अनेकांनी या पूरात फिरण्याचा आनंद घेतला. गंगा आली हो अंगणी म्हणत अनेक सुवाशिनींनी अंगणात आलेल्या गोदामाईची पूजा करुन तिची ओटी भरली. बालगोपाळांनाही पूराच्या पाण्यात मजा करु दिली.
या वर्षी मृग नक्षत्र सुरु होण्या अगोदर मोसमपुर्व पाऊस जोरदार बरसून शेतक-यांना पेरणी करण्यास उद्युक्त केले होते. अनेक शेतकर्यांनी पेरण्या केल्या. रोपे आली पण पाउस पडेना. अधून मधुन पावसाची भुरभुर सुरु होती पण त्या पावसात दम नव्हता. पण भुरभुर पावसाने पिकांनी तग धरला होता. ज्या शेतक-यांच्या विहिरी होत्या, जवळ नदी नाले होते, अशा शेतक-यांनी मोटरने पाणी भरुन आवणीही करुन घेतली. मृग, आर्द्रा, पुनर्वसु असे नक्षत्र आले आणि गेले. पण पाऊस पडेना. त्यानंतर पुनर्वसुच्या उत्तरार्ध व पुष्यच्या नक्षत्रास सुरुवात झाली. गेल्या चार दिवसांपासुन तालुक्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. तालुक्यात सायंकाळ पर्यंत नुकसान काहीच नव्हते पण घोटी रस्त्यावर कोजुली गावात मात्र देवीदास भिवा पोटकुळे यांच्या घराची पडझड मात्र झाली. अन्य काहीही नुकसान झाले नाही. दरम्यान शेतीच्या कामांना वेग आला असुन शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.