त्र्यंबकेश्वर – दोन वर्षांपासून आलेले कोरोनाचे सावट यापुढे कायमस्वरुपी दूर व्हावे, रोगराईची साथ येऊ नये, बाह्य जगता वरील युध्दाचे ढग जाऊन सर्वत्र शांतता नांदावी, मानवी जीवन सुखकर व्हावे या उदात्त हेतूने अर्थात विश्वकल्याणार्थ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तीन दिवसीय वसंतोत्सवाचे अर्थात बोहाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मृत्युंजय बहूउद्देशीय सामजिक संस्था, त्र्यंबकेश्वरचा राजा मित्र मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहभागाने सदर वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मार्च, १ आणि २ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेपासून पारंपरिक सोंगांची मिरवणुक निघणार आहे. २ एप्रिल अर्थात गुढी पाडव्याच्या दिवशी बोहाड्याचा मुख्य दिवस असून त्या दिवशी रात्रभर सोंगे मिरवले जातील तर ३ एप्रिलला प्रात:काळी परदेशी घराण्याकडे मान असलेल्या देवीची मिरवणुक होईल.
या कार्यक्रमाचे नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी श्री गंगा गोदावरी मंदिरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, विलास वाडेकर, गोविंदराव मुळे, बाळासाहेब चांदवडकर, मिलिंद धारणे, निषाद चांदवडकर तथा आकु महाराज, सनी ऊगले, बाळासाहेब पाचोरकर, पंकज लोंढे, मनोज थेटे, मोरेश्वर थेटे, अजय अडसरे, धनेश मुंदडा, किरण चौधरी, अक्षय नारळे, जयदीप शिखरे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.