नवी दिल्ली – देशातील दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनमधील एसएमएसची सुविधा बंद केल्याने ग्राहकांना असुविधेचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात ग्राहकांनी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दणका दिला आहे.
टेक्स्ट मेसेज किंवा १९०० शॉर्ट कोड एसएमएस पाठविण्याची सुविधा त्वरित कार्यान्वित करण्याचे आदेश ट्रायने देशातील दूरसंचार कंपन्यांना दिला आहे. या सुविधेच्या मदतीने युजर्स एका नेटवर्कमधून दुसर्या नेटवर्कमध्ये सोप्या पद्धतीने पोर्ट करू शकणार आहे. ही सुविधा प्रीपेड आणि पोस्टपेडच्या सर्व ग्राहकांना देण्याचे आदेश दिले आहेत.
दूरसंचार कंपन्यांनी काही नव्या टेरिफ प्लॅनमध्ये मोफत एसएमएस पाठविण्याची सुविधा बंद केली होती. त्यामुळे ग्राहक नंबर पोर्ट करण्यासाठी मेसेज पाठवू शकत नव्हते. दूरसंचार कंपन्यांचा हा धूर्तपणा नियमांचे उल्लंघन असल्याचे ट्रायने म्हटले आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, प्रीपेड युजर्सना एसएमएसची सुविधा नाकारणे मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजेच एमएनपीच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे सर्व दूरसंचार कंपन्यांना प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही मोबाईल युजर्ससाठी एसएमएस सेवा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्राहकांनी केल्या तक्रारी
दूरसंचार कंपन्यांच्या ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पुरेसा रिचार्ज करूनही ग्राहक शॉर्ट कोड १९०० एसएमएस पाठवू शकत नव्हते. काही दूरसंचार कंपन्या काही निवडक प्रीपेड प्लॅनमध्ये एसएमएस सुविधा देत नसल्याच्या तक्रारीही ट्रायकडे करण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनमध्ये एसएमएस सुविधा देत नव्हते. या सर्व प्रीपेड प्लॅनमध्ये टॉकटाइम आणि डेटा दिला जात आहे.