इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या सोयीसाठी नियम बदलण्यात सगळेच माहीर असतात. पण, आपल्याच चुकीमुळे अपघात झाला तर त्याची जबाबदारी मात्र कोणीच घेताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. एखाद्या दुचाकीवरून जास्तीत जास्त किती लोक जातील, असा तुमचा अंदाज आहे? १, २ की ५? एका दुचाकीस्वाराने चक्क ७ जणांना दुचाकीवरून नेलं. आणि महत्त्वाचे म्हणजे ही सगळी मुले होती. त्यामुळे हा प्रवास निश्चितच धोकादायक ठरू शकतो. पण त्याहीपुढे जाऊन आपल्या मुंबई पोलिसांनी या दुचाकीस्वाराला चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.
नेमकं घडलं काय?
स्वतःच्या चार आणि शेजारच्या तीन मुलांना शाळेत सोडत असताना एका दुचाकीस्वाराने हा व्हिडीओ काढला. त्याने हा व्हिडीओ काढून तो मुंबई पोलिसांना ट्वीट केला होता. त्यानंतर दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी चालकाला शोधून काढले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला केवळ दंड ठोठावला नसून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.
नियम सुरक्षेसाठीच
नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊनच नियम तयार करण्यात आलेले असतात. त्यामुळेच नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कठोर कारवाई केली जाते.