इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक समजले जातात. आमदार, खासदार किंवा मंत्री यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत. परंतु काही वेळा जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्याऐवजी या लोकप्रतिनिधी मुळे जनतेची अडचण होऊ शकते. इतकेच नव्हे तर त्यांचा वाहनांचा ताफा या मार्गावरून जातो, तेथे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. या गैरसमजातून देखील अनेकदा नागरिकांचे अत्यावश्यक कामे खोळंबून पडतात. इतकेच नव्हे तर एखादा रुग्ण या मार्गावरून जात असल्यास उपचाराअभावी दगावू देखील शकतो अशीच घटना आंध्र प्रदेशात घडली.
आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये नवजात अर्भकाच्या उपचारात दिरंगाई झाल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या नवनियुक्त महिला आणि बालकल्याण मंत्री उषा श्रीचरण यांच्या ताफ्याला जाण्यासाठी अन्य वाहतूक बंद केल्याने उपचारात उशीर झाल्याबद्दल मुलाच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे.
मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एका ऑटोमधून मुलाला घेऊन हॉस्पिटलला जात असताना पोलिसांनी मंत्र्यासाठी त्यांचा रस्ता अडवला, त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. महिला व बालकल्याण मंत्री उषा यांच्या विजय ताफ्यासाठी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. त्यामुळे कल्याणदुर्गातील चेर्लोपल्ली गावातील आठ महिन्यांच्या चिमुरडीला रुग्णालयात नेता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी तेलुगू देसम पक्षाचे नेते कलावा श्रीनिवासुलू यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याला अमानुष घटना म्हणत याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.