इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑनलाइन गेमिंगचे तोटे सर्वश्रुत आहेत. फक्त हे तोटे वेगवेगळ्या मार्गाने सर्वांच्या समोर दररोज येत असतात. चंदीगडमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. येथील पिपलीवाला टाउन येथील औषध व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलाने पबजी, फ्री फायर आणि कार रेसिंग गेममदध्ये तब्बल १७ लाख रुपये गमावले आहेत. ही रक्कम त्याने घरातूनच चोरली होती. या घटनेबाबत काहीच माहिती नसलेल्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात पैसे चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन अल्पवयीनांसह ४ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपीसह त्याचा आतेभाऊ आणि एका मित्राचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याच्या मुलाने रक्कम चोरी करून तीन आयफोन, कपडे आणि बूट खरेदी केले होते. एवढेच नव्हे, त्याने हवाई प्रवासही केला. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून सूरज (२७ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तीन अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दहा लाख २२ हजार ५०० रुपये आणि तीन आयफोन जप्त केले आहेत. आरोपी सूरज १२ वी उत्तीर्ण करून प्रायव्हेट डेटा एन्ट्री ऑपरेटरचे काम करत होता. अल्पवयीन मुलांना ऑनलाइन गेम खरेदी करण्यासाठी आरोपी सूरज प्रोत्साहित करत होता असा आरोप आहे.
१२ जानेवारीला औषध व्यापारी हुकूमचंद यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२० (फसवणूक) आणि १२० बी (कट रचणे) हा गुन्हा जोडण्यात आला. तक्रारकर्त्याने पोलिसांना सांगितले, की घरात बेडमध्ये १९ लाख रुपये ठेवले होते.त्यापैकी १७ लाख रुपये चोरी झाले होते. त्यानंतर एसएसपी कुलदीप चहल यांच्या निर्देशानुसार डीएसपी एसपीएस सोधी यांच्या देखरेखीखाली एसएचओ नीरज रसना यांच्यासह एका पथकाने आरोपींचा भांडाफोड केला.