मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने जाहीर केलेल्या विक्रीकराची अभय योजना २०२२ ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. २२ सप्टेंबर २०२२ ला विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के म्हणजे १ लाख ५० हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या अभय योजनेचा लाभ झाला असल्याची माहिती वस्तू व सेवाकर विभागाने दिली आहे.
१ एप्रिल २०२२ ला ही योजना सुरु झाली असून, जीएसटीपूर्व कायद्यांच्या थकबाकीतून कायमचे बाहेर पडण्याची शेवटची नामी संधी असे या योजनेचे वर्णन केले जात आहे. आतापर्यंतच्या प्रतिसादावरून ही योजना सर्वात आकर्षक आणि व्यापारी वर्गासाठी सर्वात जास्त फायदेशीर अभय योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छोट्या व्यापाऱ्यांकरिता आकर्षक सवलती
या योजनेत छोटे व्यापारी विशेषत: ज्यांची थकबाकी १० हजारापर्यंत आहे त्यांना अर्ज देखील दाखल न करता पूर्ण थकबाकी माफ करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेची वैशिष्ठ्ये ठरलेली व कमालीचा पाठिंबा लाभलेली वर्गवारी म्हणजे १० हजार ते १० लाखापर्यंतची प्रलंबित थकबाकी असलेल्या या वर्गवारीतच विभागाकडे सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे देखील आहेत. या वर्गवारीत एकरकमी फक्त वीस टक्के थकबाकी भरून ऐंशी टक्के सरसकट माफ केली जात असल्याने, अधिकाधिक व्यापाऱ्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकीतून कायमची मुक्तता मिळवलेली आहे. तसेच मोठ्या म्हणजे ५० लाखापेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी हप्तेसवलतीसारखा सोयीचा पर्याय उपलब्ध असल्याने, अशा मोठ्या प्रलंबित थकबाकी करिता देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
व्यापारातील अनेक प्रश्नांना एकच उत्तरः अभय योजना २०२२
अपिलातील प्रलंबित थकबाकीचा पाठपुरावा करण्यात सर्वसामान्य व्यावसायिकाचा व्यवसायातील बहुमूल्य वेळ व पैसा नाहक खर्च होत असतो. थकबाकीला स्थगिती नसेल तर स्थावर व जंगम मालमत्ता लिलावात निघण्याची शक्यता डोक्यावर असते. कोरोना ताळेबंदीमुळे व्यापारावरील अनिष्ट परिणाम, ढासळलेले अर्थगणित, त्यामुळे व्यापारी वर्गाने या नामी संधीचे जोरदार स्वागत केले आहे.
त्यामुळे अपिलात होणारा वेळेचा व पैश्याचा अपव्यय तसेच विभागाकडून होणारी वसुलीची कार्यवाही टाळण्यासाठी अभय योजनेत सहभागी होऊन जीएसटी कारकिर्दीत व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यावर अनेकांनी भर दिल्याचे या योजनेच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे.
१९७० पासूनच्या सुद्धा प्रलंबित थकबाकीसाठी या योजनेत अर्ज सादर केले गेले आहेत. त्याचप्रमाणे विक्रीकर न्यायाधिकरण अथवा उच्च न्यायालयातील देखील प्रलंबित दावे मागे घेत अनेकांनी या योजनेचा लाभ घेणे पसंत केले आहे. सर्व वर्गातून लाभत असलेल्या या प्रतिसादावरून ही योजना व्यापारीभिमुख ठरत आहे. सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही अभय योजना ३० सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे योजनेच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वस्तू व सेवाकर विभागामार्फत करण्यात आले आहे.
Traders Businessman Abhay Scheme Last Day Today
Sales Tax GST State Government Maharashtra