नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी हिताच्या विरोधातील आणि खाजगीकरणाला प्रोत्साहित करणा-या धोरणाच्या विरोधात भारतीय ट्रेड युनियनने सोमवारी (दि.२८) विभागीय महसुल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले.
नाशिकरोड बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून या मोर्चास प्रारंभ झाला. मिना बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनगेट मार्गाने महसुल आयुक्तालायावर हा मोर्चा आला. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देवून निर्देशने करण्यात आली.पेट्रोल, डिझेल, गॅसवरील केंद्रिय कर कमी करा, जीवनावश्यक वस्तुगाई कमी करा, श्रमसंहिता रद्द करा, सर्व पिकांसाठी किमान हमी भावाचा कायदा करा व पीक खरेदीची यंत्रणा उभी करा,
कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करू नका, राष्ट्रीय रोखीकरण रद्द करा, आयकर लागु नसलेल्या कुटुंबांना स्वस्त धान्य आणि मासिक ७५०० रूपये रोख अनुदान दया, मनरेगासाठी जास्त निधीची तरतूद करून सर्वांना किमान ६०० रूपये रोजगार वर्षातुन २०० दिवस रोजगाराची हमी द्या, शहरी भागाला रोजगार हमी लागु करा, बेरोजगारांना जगण्याइतका भत्ता द्या, सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शनसहित सर्व सामाजीक सुरक्षा लागु करा, सर्व अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण, रोजगार सेवक, बालकामगार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्व योजना कर्मचा-यांना कायम करून किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लागु करा, सर्व करोना योध्दा कर्मचा-यांना योग्य मोबदला, सुरक्षा साधने, मोफत उपचार, विमा संरक्षण द्या, शेती, शिक्षण, आरोग्य आणि अन्य समाजोपयोगी क्षेत्रावरील सार्वजनिक गुंतवणुक वाढवा, त्यासाठी लागणा-या निधीसाठी अतिश्रीमंत वर्गावरील उत्पन्न व संपत्ती करात वाढ करा आदी मागण्या निवेदनाद्वारे आंदोलकांनी यावेळी विभागीय आयुक्तांकडे केल्या. यावेळी आनंद गांगुर्डे, हिरामण तलोरे, स्वरुप वाघ, राहुल गायकवाड, भगवान खाडे, शिवाजी म्हस्के, संदिप गुंजाळ, अंकुश घिंदळे, सुनिल चंद्रमोरे, सोमनाथ खैरनार, रविंद्र मोरे, सुनिल सोनावणे, गोरख सुराशे, गौतम कोंगळे, संजय पवार आदि उपस्थित होते.