त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या नियमांचे पालन करीतत भगवान त्र्यंबकराजाचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला. पुर्वापार पासुन विजया दशमीच्या दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे सीमोल्लंघन झाल्यावरच नागरीक सीमोल्लंघनाला निघतात. मागीलवर्षी सर्वत्र कोरोनाची भिती व त्या पार्श्वभूमिवर मंदिर बंद असल्याने हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा झाला होता व त्यावेळी ग्रामस्थांना देखील यामध्ये सहभागी होण्याची परवानगी नव्हती. मात्र यावर्षी कोरोनाच्या नियमांमधून बरीचशी सुट देण्यात आल्याने व धार्मिक स्थळे देखील उघडल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दरवर्षी सजवलेल्या बैलगाडया, भरजरी पारंपारीक पेहराव असलेले सशस्त्र पहारेकरी, घोडेस्वार, नगारावादक, बॅण्ड पथक असा लवाजमा असायचा मात्र यावर्षी देखील कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पाडण्यात आला होता.
दुपारी तीन वाजता पानाफुलांनी सजवलेल्या पालखीतून भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा सूर सनईच्या तालावर वाजत गाजत मेनरोड मार्गे कुशावर्त तिर्थावर नेण्यात आला. गोदामाईला वंदन करून बोहरपट्टी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. आंबेडकर चौक, जव्हार फाटा मार्गे शासकीय विश्राम गृहा जवळील शमिवृक्ष पुजन स्थळी पालखी नेण्यात आली. देवस्थानचे विश्वस्त तृप्ती धारणे यांचे सासरे तथा भाजपाचे नेते पंकज धारणे यांचे वडील प्रभाकर त्र्यंबक धारणे यांनी आपले वडील कै. त्र्यंबक काशिनाथ धारणे यांचे स्मरणार्थ नाशिक – त्र्यंबक रोडला लागुन एक गुंठा जमीन सीमोल्लंघनसाठी देवस्थान ट्रस्टला दान दिली. येथे मंडप टाकून फुलांच्या पायघडया टाकण्यात आल्या होत्या. या ठिकाणी पालखी ठेवण्यात आली. जयश्री धारणे, तृप्ती धारणे, समृध्दी धारणे आदींसह महिलांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे औक्षण केले. यानंतर विश्वस्त प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार, अॅड. पंकज भुतडा, संतोष कदम, भुषण अडसरे, तृप्ती धारणे यांचे हस्ते शमी वृक्ष पुजन करण्यात आले. पुजेचे पौरोहित्य ग्रामजोशी श्रीकांत मुळे, श्रीमंत पेशव्यांचे वंशपरंपरागत उपाध्ये दिलीप रुईकर, गंधर्व वाडेकर आदींनी केले. पुजा संपन्न झाल्यावर शमी वृक्षाचे पाने तोडून सर्वांनी सोने लुटले. उपस्थितांना पेढयाचा प्रसाद देण्यात आला. यावेळी पंकज धारणे, पराग धारणे, व्यंकटेश धारणे, शागिर्द विलास शास्त्री वाडेकर, गिरीश जोशी, मंगेश दिघे, सचिन दिघे, राधेय कुलकर्णी, यज्ञेश कावनईकर, कुणाल लोहगावकर, देवस्थान ट्रस्टचे अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, रशवी जाधव, अंकुश जाजडा, विजय गंगापुत्र आदिंसह देवस्थानचे कर्मचारी आदिंसह भाविक उपस्थित होते. यानंतर पालखी जव्हार रोड मार्गे ग्रामदेवता महादेवी मंदिरा समोर नेऊन तेथे देवीला साडीचोळी अर्पण करुन देवीची ओटी भरण्यात आली. श्री शनि मारूती मंदिरा मार्गे पालखी पुन्हा त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आणण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात भगवान त्र्यंबकेश्वराचे औक्षण करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास सीमोल्लंघन करीत ग्रामस्थांनी श्री तुपा देवी व भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले. योग्यती काळजी घेत एकमेकांना सोने व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.