इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टोयोटा कंपनीने आपल्या २७०० इलेक्ट्रिक कार्स परत मागवल्या (रिकॉल) आहेत. या कार्सच्या व्हील्समध्ये सातत्याने अडचणी येत असल्याचे लक्षात घेउन कंपनीने हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
टोयोटाच्या bZ4X या इलेक्ट्रिक एसयुव्हीला जपानमध्ये लाँच होउन दोन महिनेदेखील झालेले नाहीत. तरीदेखील एवढ्या मोठ्या संख्येने कार रिकॉल करण्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी सूचना दिल्याने चर्चा रंगली आहे. कंपनीने जाहीर केल्यानुसार, सुरक्षा कारणांमुळे युएस, युरोप, कॅनडा आणि जपानमध्ये विकण्यात आलेल्या सर्व टोयोटा इलेक्ट्रिक कार्स पुन्हा मागवण्यात आल्या असून त्यानंतर व्हील्समधील सर्व अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
या सर्व कार्स पुन्हा तपासून त्यात नेमक्या काय चुका झाल्यात, याची माहितीही कंपनीकडून घेण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग करीत असताना व्हील जर वेगळे झाले तर, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या समस्येचे समाधान होत नाही. तोपर्यंत अशा कार्सची कोणीही ड्रायव्हिंग करु नये, असेही सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे, कारचे व्हील्समध्ये समस्या नेमकी काय अडचणी आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कंपनी या अडचणींबाबत तपास करत आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. तसेच, जपानी कार मॅन्यूफक्चरिंग कंपनी सुबरुनेदेखील याबाबत अधिक खुलासा केला असून कंपनीदेखील आपली इलेक्ट्रिक कार Solterra च्या २६०० युनिट्सला रिकॉल करत असल्याची माहिती आहे. या कंपनीच्या कार्सच्या व्हील्समध्येही अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये टोयोटाला येण्यास बराच विलंबही झाला आहे. टोयोटाची प्रतिस्पर्धी टेस्लाने चौदा वर्षांपूर्वीच आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. टोयोटाने जपानमध्ये मागील महिन्यात इलेक्ट्रिक कार bZ4X लाँच केली आहे. या कारला प्रतिसाद मिळत असतानाच आता कंपनीने कार परत मागवल्याने चर्चा रंगली आहे.
Automobile Toyota recall 2700 cars for this reason