इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केबल कारच्या ट्रॉलीतून पर्यटक जात असताना ही ट्रॉली हवेतच अडकली आहे. तांत्रिक बिघाडामुळे १५ पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. त्यामुळे या सर्वांचा जीव हवेतच असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात माहिती मिळताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव ओंकार चंद शर्मा यांनी सांगितले की, दोन केबल कारमध्ये एकूण १५ पर्यटक अडकले आहेत. ४ पर्यटक वर आणि ११ पर्यटक खाली टेकडीजवळ अडकले होते. पहिल्या टप्प्यात ४ जणांची सुटका करण्यात आली. खालच्या टेकड्यांमधील ट्रॉलीमध्ये ११ जण अडकले होते. यापैकी ७ जणांची सुटका करण्यात आली तर ४ जणांची सुटका थोड्याच वेळात केली जाणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसारीत केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॉली हवेत लटकत असल्याचे दिसत आहे. बचावकार्य सुरूच आहे. एका पर्यटकाला दोरीच्या साहाय्याने खाली उतरवले जात आहे. कसौलीचे प्राताधिकारी धनबीर ठाकूर यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती बचाव दल (एनडीआरएफ)ची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
अडकलेल्यांमध्ये काही महिला पर्यटकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही केबल कार रस्त्याच्या मधोमध अडकल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. सर्व पर्यटक दीड तासांहून अधिक काळ तेथे अडकले असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही १९९२ मध्ये याच रोपवेवर अपघात झाला होता. सुमारे १० पर्यटक तब्बल ३ दिवस ट्रॉलीमध्ये अडकले होते. त्यापैकी एकाचा मृत्यूही झाला होता. त्यावेळी लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांनी जीवावर उदार होऊन पर्यटकांना वाचविले होते.
https://twitter.com/ANI/status/1538822283459895296?s=20&t=Ap4bO_v3v98Y2dW7Nyiirg
tourist stuck in mid air Rescue operation Parwanoo Timber Trail cable car trolley Himachal Pradesh