अजय सोनवणे, निलेश गौतम ,इंडिया दर्पण वृत्तसेवा
बागलाण तालुक्याती शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर आज दुपारच्या सुमारास दोन हौशी पर्यटक पाय घसरून दरीत कोसळल्याची घटना दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय मोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. आज मालेगाव येथील १२ तरुणांचा एक समूह पर्यटनासाठी आलेला होता. या ग्रुपने अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर वाडीकडील उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. येथील अतिशय अवघड अशा ६५ पायऱ्या आहेत. याच ठिकाणाहून भावेश शेखर अहिरे (वय २१) या तरुणाचा पाय घसरला. हा तरुण दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मनिष सुनील मुठेकर (वय २१) हा देखील याच ठिकाणाहून खाली कोसळला असून तो जखमी आहे. ही घटना घडताच ग्रुप मधील काही तरुणांनी घटनेची माहिती मालेगाव येथे दिली. यानंतर घटनास्थळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांनी धाव घेतली. मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचविण्यासाठी मालेगावहून साल्हेर किल्ल्याजवळ आले. त्यांनीही चढाईकरून जखमीला आपल्या पाठीवर बसवून थेट खाली उतरले. दुसरीकडे मगरबारयाचा गणपती असलेल्या परिसरातून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
घटनेची माहिती साल्हेरचे सरपंच मधुकर भोये यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात माहिती दिली. यानंतर माहिती मालेगाव येथे देण्यात आली. जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलीस नाईक रवी भामरे पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.