श्रावण मास विशेष…
जगातील एकमेव आणि अदभूत असे जोड शिवमंदिर…
हळेबीड (कर्नाटक)
नमस्कार, देखो अपना देश या अंतर्गत हटके डेस्टिनेशन मालिकेत आपण भेट आज देणार आहोत प्राचीन भारताचे वैभव बघण्यासाठी हळेबीड येथे. अप्रतिम ठिकाण असलेल्या या भागात पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. तर वेळ न दवडता आपण सफर करुया या सुंदर ठिकाणाची…
हळेबीड हे कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी या गावाला द्वारसमुद्र असे म्हटले जायचे. हळेबीड या गावाला तेथील मंदिरे, शिल्पे आणि तीर्थक्षेत्र यांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. होयसळ राजांंच्या कालखंडात (१२व्या शतकामध्ये) हळेबीड ही राजधानी होती. येथील होयसळ कालीन स्थापत्य कला आणि भव्य मंदिरे, जैन मंदिर यांंमुळे हे स्थळ जणू वास्तुकलेच्या रत्नांची खाणच भासते.
पुढील पिढीला आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसांची माहिती व्हावी, असे वाटत असेल तर हळेबीड हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे होयसळेश्वर आणि केदारेश्वर ही मंदिरे आहेत. या ठिकाणी १४ व्या शतकामध्ये दिल्ली सल्तनतीचाचा सुलतान मलिक काफूरने या भागाची लूट करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे स्थळं बराच काळ दुर्लक्षितच होते.
येथील होयसळेश्वर मंदिर १२व्या शतकात येथील राजा विष्णूवर्धन यांनी तेथील मानवनिर्मित तलावाच्या किनारी बांधले. हे मंदिर या भागातील सगळ्यात मोठे शिवाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम जवळपास ४० वर्ष सुरू होते, असे म्हणतात. हे एक जोडमंदिर आहे. यातले एक मंदिर होयसळेश्वर आणि दुसरे संताळेश्वराचे मंदिर आहे. एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी संकल्पना असलेली ही दोन्हीही शिव मंदिरे आहेत. विशेष म्हणजे या मंदिरासमोर दोन स्वतंत्र नंदी आहेत.
या मंदिराच्या भिंतींवर पुराणातील अनेक दंतकथा कोरल्या आहेत. बाहेरील भिंतीवर रामायण आणि महाभारतातील अनेक कथा आपल्याला दिसतात. मंदिराची कलाकृती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. प्रत्येक भिंत आणि कलाकृतीवर लिहायचे ठरवले तर एखादे पुस्तकच या मंदिरावर होईल. या अवर्णनीय कलाकृतीचे साैंदर्य डोळ्याने पहिल्याशिवाय उमजणार नाही. अनेकांनी या मंदिरावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे व डॉक्युमेंट्रीही बनविल्या आहेत.
होयसळेश्वर मंदिर जेवढे सुंदर आहे त्याच तोडीचे केदारेश्वराचेही मंदिर आहे. केदारेश्वराचे मंदिर राजा वीर बल्लाळ आणि राणी केतलादेवी ११७३ ते १२२० च्या कालखंडामध्ये बांधले. हे मंदिर पुरातत्व खात्याकडून जतन करण्यात येत आहे. हे मंदिर साबणासारख्या मऊ वाटणाऱ्या, कोणतेही कोरीव काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा दगडापासून बनवले आहे.
जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या मंदिराला तीन गाभारे आहेत आणि यात ब्रम्हा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती आहेत. बाह्य भिंतीवर पुरातन काळातील अनेक वेगवेगळ्या कथा कोरल्या आहेत. हे मंदिर ताऱ्याच्या आकारात बांधले असल्यामुळे हे इतर मंदिरापेक्षा वेगळे आहे. या दोन्ही मंदिरासोबतच अनेक लहान मोठी मंदिरे या गावात आहेत, प्रत्येक मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुमचा वेळ कसा जाईल, हे कळणारही नाही. काही तरी अद्भुत बघत आहोत, याची अनुभूती येईल यात काही शंका नाही.
काय बघाल
येथे तुम्ही होयसळेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, बेलूर मंदिर (१५ किमी), यागाची डॅम आणि जवळच असलेलं बदासी हल्ली हे ऐतिहासिक प्रसिद्ध जैन मंदिर तुम्ही पाहू शकता.
भेट देण्यास योग्य वेळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ असेल.
कसे पोहचाल
मंगलोर विमानतळ येथून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. तर हसन रेल्वे स्टेशन हे अवघ्या २७ किलोमीटर अंतरावर आहे.
Tourist Destination Connected Shiv Mandir by Datta Bhalerao
Halebid Karnataka Hoysaleshvar Kedateshvar Archeology