सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे अत्यंत आदराचे स्थान आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते आपल्या बेताल वक्तव्यातून कोणात्याही नेत्याची शिवाजी महाराजांबरोबर तुलना करून एक प्रकारे शिवरायांचा अपमान करीत आहेत. राज्यपालांच्या शिवरायांचा संबंधित वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच विरोधी पक्षांनी या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यातच आता राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेब बादशाहने कैद करुन ठेवले होते. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. तसेच आमचे नेते एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून म्हणजे शिवसेना पर्यायाने मविआ मधून बाहेर पडले, असे म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली आहे.
लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार निषेध नोंदवला असून या प्रकरणावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. आधीच छत्रपती शिवरायांवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठे वादंग सुरुच असतानाच आता पर्यटनमंत्री लोढा यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. प्रतापगडावर आज दि. ३० नोव्हेंबर रोजी ३६३ शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे आदी नेते उपस्थित होते. त्यावेळी भाषणात लोढा यांनी हे वादग्रस्त विधान केले.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत सरकारला चांगलेच सुनावले आहेत. या वाचाळविरांना आवरा हे मी सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागले आणि बोलले पाहिजे, याचं भान असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की , लोढा हे चुकून बोलले किंवा बोलण्याच्य ओघात अशी तुलना केल्याचे मी मानत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराजांचा अपमान हा भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, मंगलप्रभात लोढा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काही संबंध असेल, असे मला वाटत नाही. त्यांच्याकडे जरी पर्यटन खाते असले तरी त्यांना शिवरायांच्या इतिहासाबाबत कितपत माहिती आहे? हा अभ्यासाचा विषय आहे. त्यांना इतिहासाची जाण असेल किंवा त्याची बुद्धी असेल, असं मला वाटत नाही. मात्र याबाबत सारवासारव करताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, मंगल प्रभात लोढांनी जे उदाहरण दिले त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. शिंदे हे दबावाखाली होते, कडेकोट बंदोबस्तात होते. त्यातून सुटका त्यांनी केली.
Tourism Minister Mangal Prabhat Lodha Controversial Statement
Eknath Shinde Shivaji Maharaj Agra Comparison