नाशिक : ‘टोसिलुझुमॅब’ या इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या दोघांना गंगापूर परिसरात पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. प्रणव केशव शिंदे (२४, लक्ष्मणरेखा सोसायटी, पंचवटी), संकेत अशोक सावंत (२५, रा.न्यू तेजश्री अपार्टमेंट, मखमलाबाद नाका, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या घटनेत दोन जणांचा पोलिस शोध घेत आहे.
या घटनेत पोलिसांनी ४० हजार ६०० रुपये किंमतीचे एक इंजेक्शन ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ३ लाखांची मोटार, आठ हजारांची रोख रक्कम, महागडे मोबाईल असा सुमारे ४ लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख (४५) यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रणव व त्याचा एक मित्र फार्मसीचे विद्यार्थी
विशेष म्हणजे प्रणव व त्याचा एक मित्र हे दोघे शहरातील एका नामांकित महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत आहेत. या दोघांसोबत त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी मिळून नातेवाईकासाठी आणलेल्या इंजेक्शनपैकी उरलेले एक इंजेक्शन सोशल मीडियाद्वारे गरजूंसोबत संपर्क साधत २ लाख ६० हजारांना विक्री करण्याचे निश्चित केले होते. त्यात त्यांना पोलिसांनी साफळा रचुन अटक केली.
असा रचला साफळा
एका रुग्णालयाच्या बाहेर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी काही संशयित येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी सापळा पोलिसांनी रचला. त्यानंतर बनावट ग्राहक तयार करुन संशयितांसोबत संपर्क करत ठरलेल्या ठिकाणी बोलविण्यात आले. तेथे एका स्विफ्ट कारमधून ( एमएच १५ एफएन ५०५५) संशयित प्रणव केशव शिंदे संकेत अशोक सावंत हे आले. यावेळी बनावट ग्राहकाने मागणी करत इंजेक्शन ताब्यात घेतले. यावेळी अन्न औषध प्रशासनासाच्या निरीक्षकांनी कारमध्ये बसलेल्या तरुणांना औषधविक्रीचा परवाना मागितला. पण, त्यांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी कारला घेराव घालत चौघांना ताब्यात घेतले.