मुकुंद बाविस्कर, मुंबई
भारतीय तरूण जगातील अन्य कोणत्याही देशाच्या तरुणांपेक्षा बौद्धिक क्षेत्रात मागे नाहीत, असे म्हटले जाते. किंबहुना जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीय तरुण हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक पाऊल पुढेच आहेत, असेही म्हटले जाते. याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. कारण जगातील अनेक मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या सर्वोच्च पदावर भारतीय वंशाचे तरुण विराजमान झालेले दिसतात.
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे आता नवीन सीईओ असतील. त्यामुळे जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या सीईओ पदावर विराजमान झालेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या यादीत पराग अग्रवाल यांचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यामुळे आता जगातील १० सर्वात मोठ्या टेक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे नागरिक करत आहेत. पराग अग्रवाल प्रमाणेच भारतीय वंशाचे नागरिक सुंदर पिचाई हे गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ आहेत. याशिवाय अन्य कोणत्या कंपन्याच्या वरिष्ठ पदांवर भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या-
सुंदर पिचाई (सीईओ, गुगल आणि अल्फाबेट)
ऑगस्ट २०१४ मध्ये सुंदर पिचाई गुगलचे प्रमुख बनले. यानंतर 2019 मध्ये पिचाई यांना गुगल सोबत अल्फाबेटचे सीईओ बनवण्यात आले. त्याने आयआयटी खरगपूरमधून शिक्षण घेतले आहे.
सत्या नाडेला (अध्यक्ष आणि सीईओ, मायक्रोसॉफ्ट)
हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नाडेला 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले. त्यांनी महिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले आहे.
शंतनू नारायण (अध्यक्ष आणि सीईओ, Adobe)
हैदराबादमध्ये जन्मलेल्या शंतनूने 1998 मध्ये Adobe चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर ते 2005 मध्ये सीओ आणि 2007 मध्ये सीईओ बनले.
अरविंद कृष्णा (अध्यक्ष आणि सीईओ, आयबीएम)
अरविंद कृष्णा 2020 मध्ये IBM चे CEO बनले. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले आहे. त्यांना आयबीएम मध्ये 30 वर्षांचा अनुभव आहे.
रेवती अद्वैत (सीईओ, फ्लेक्स)
रेवती अद्वैत यांना 2019 मध्ये फ्लेक्सच्या सीईओ बनवण्यात आले. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून बॅचलर डिग्री केली आहे. तर थंडरबर्ड स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटमधून एम.बी.ए.केले आहे.
निकेश अरोरा (सीईओ व अध्यक्ष, पालो अल्टो नेटवर्क्स)
निकेश अरोरा 2018 मध्ये पाउलो अल्टो नेटवर्क्सचे CEO म्हणून रुजू झाले. त्यानंतर अध्यक्ष बनले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बॅचलरची पदवी घेतली आहे.
जयश्री उल्लाल (अध्यक्ष आणि सीईओ, अरिस्ता नेटवर्क)
जयश्री उल्लाल 2008 मध्ये कंपनीच्या सीईओ बनल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अरिस्ताने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर आयपीओ आणला.
अंजली सूद (सीईओ, विमियो)
अंजली सूद 2017 मध्ये व्हिडिओ प्लॅटफॉर्म विमियोच्या CEO बनल्या. याआधी सूदने Amazon आणि Time Warner मध्ये काम केले आहे. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे.
अरमान भुतानी (सीईओ, GoDaddy) – अरमान भुतानी यांना 2019 मध्ये GoDaddy च्या CEO ची जबाबदारी मिळाली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलरची पदवी घेतली. तर लँकेस्टर विद्यापीठातून एम.बी.ए.केले आहे.
पराग अग्रवाल (सीईओ, ट्विटर)
पराग यांनी नुकतेच सीईओ झाले आहेत. त्यांच्यापूर्वी जॅक डोर्सी हे सीईओ होते. पराग हे पूर्वी ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) होते. विशेष म्हणजे अग्रवाल हे आयआयटी मुंबई आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.