पुणे – लहानपणी आजारी पडल्यानंतर डॉक्टर तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगत होते, हे तुम्हाला लक्षात आहे का? कदाचित तेव्हा तुम्ही याच्या कारणाकडे जास्त लक्षपूर्वक पाहिले नसेल. परंतु तुमच्या तब्येतीचा अंदाज घेण्यासाठी डॉक्टर जीभ पाहायचे. जिभेचा रंग किंवा जिभेमध्ये होणार्या बदलाच्या आधारावर रोगाचे निदान केले जाऊ शकते. जिभेमध्ये होणार्या बदलाच्या आधारावर कर्करोग आणि मधुमेहसारख्या आजारांबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, समान्य परिस्थितीत निरोगी जिभेचा रंग गुलाबी असतो. जर तुम्हाला जिभेचा रंग किंवा बनावटीत काही बदल जाणवत असेल त सावध व्हायला हवे. अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकमधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॅनिएल अॅलन सांगतात, जिभेमध्ये वेदना होणे किंवा खूप लाल होणे किंवा जिभेवर पुरळ येणे अशी लक्षणे अनेक आजारांचे संकेत असू शकतात. त्या आजारांचे वेळेवर निदान होणे आवश्यक आहे. जिभेमध्ये होणार्या बदलांवरून आजारांचा अंदाज कसा घ्यावा हे जाणून घेऊयात.
निरोगी आणि आजारी जिभेची ओळख
डॉक्टरांच्या माहितीनुसार, तुमचे आरोग्य चांगले असेल तर जिभेच्या माध्यमातून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. निरोगी जीभ गुलाबी रंगाची आणि बारीक दाण्याच्या पातळ थराने झाकलेली असते. काही निरोगी नागरिकांच्या जिभेचा रंग थोडा गडद किंवा विरळ असू शकतो. जिभेचा रंग लाल, पिवळा किंवा काळा असेल किंवा काही खाता-पिताना वेदना होत असतील तर शरीरात अंगभूत आजार असल्याचे संकेत मिळतात. त्याचे वेळेवर निदान होणे आवश्यक आहे.
जिभेवर पांढरे थर
आरोग्य अधिकार्यांच्या माहितीनुसार, जिभेवर पांढरे चट्टे किंवा थर असेल तर असे ओरल थ्रशमुळे होऊ शकते. ओरल थ्रश म्हणजे ईस्ट संसर्ग असतो. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ओरल थ्रश पाहिले जाते. ल्युकोप्लाकिया आजारामुळेही जिभेवर पांढरा थर असू शकतो. तंबाखूच्या उत्पादनाचे सेवन करणार्या नागरिकांमध्ये ही समस्या पाहिली जाते. काही परिस्थितीत ल्युकोप्लाकिया हा कर्करोगाचेही संकेत मानले जातात.
लाल जीभ
जिभेचा रंग गुलाबीवरून लाल होत असेल तर शरीरात काही जीवनसत्वे कमी असल्याचे संकेत मानले जातात. लहान मुलांना होणार्या कावासाकी आजारातही जीभ लाल रंगाचे होते. त्याशिवाय स्कार्लेट फिव्हरसारख्या संसर्गाच्या स्थितीत जिभेचा रंग लाल होऊ शकतो.
काळी जीभ
काही नागरिकांच्या जिभेचा रंग काळा पडू लागतो. दिसायला हे खूपच धोकादायक दिसते. परंतु ही कोणतीही गंभीर किंवा चिंताजनक परिस्थिती नसते. तोंडाची स्वच्छता नियमित केल्यास जीभ सामान्य होऊ शकते. मधुमेही रुग्णांमध्ये जिभेचा रंग काळा होण्याच्या समस्येचे निदान करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिजैवके घेतल्यानंतर किंवा किमोथेरेपी करणार्या रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते.