इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदू नववर्षाची सुरुवात मांगल्य, पावित्र्याची गुढी उभारून करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यानुसार, उद्या बुधवारी गुढीपाडवा साजरा होणार आहे. यंदा गुढी उभारण्यासाठी सकाळी ६.२९ ते ७.३० हा मुहूर्त असून त्या दरम्यान विधीवत पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या शुभ दिनी नव्या संकल्पांचा शुभारंभ केला जातो. या महिन्यामध्ये पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. या नक्षत्रावरुन चैत्र हे नाव पडले अशी आख्यायिका आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला खगोलीय गणितानुसार विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची रचना केली असे म्हटले जाते. काहींच्या मते, गुढी पाडव्याच्या दिवशी सतयुगाची सुरुवात झाली होती.
यंदा गुढीपाडवा बुधवार, २२ एप्रिल रोजी आहे. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या तिथीनिमित्त लोक पहाटे लवकर उठून तयार होतात. घरोघरी गुढ्या उभारुन त्यांची पूजा केली जाते. घराबाहेर उभारलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करु शकत नाही असे म्हटले जाते. गुढी पाडव्याची तिथी शुभ असल्याने या दिवशी नव्या कामाची सुरुवात केली जाते. ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. अनेक ठिकाणी शोभायात्रा निघतात.
छत्रपतींनी केली सुरुवात
महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्ध जिंकल्यानंतर प्रथम हा सण साजरा केला होता. त्यामुळे हा सण साजरा करण्याची आपल्याकडे प्रथा सुरू झाली असेही काहीजण मानतात.
Tomorrow Gudhipadwa Muhurta Importance and details