महाशिवरात्री महात्म्य
सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर संक्रांतीनंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्र होय. माघ शुद्ध चतुर्दशी अर्थात महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकर यांच्या पूजनाचा दिवस होय.
महाशिवरात्रीची पौराणिक कथा
देव-दानव युद्धामध्ये समुद्रमंथनाच्या वेळी अनेक प्रकारची दिव्य रत्ने दिव्य वस्तू बाहेर आल्या. बाहेर येणारी प्रत्येक वस्तू आलटून पालटून देव व दानव वाटून घेत होते. असे हे समुद्रमंथन सुरू असताना हलाहल म्हणजे विष बाहेर आले. ते घेण्यासाठी देव लोकांची समुद्राच्या पोटातील वस्तू घेण्याची पाळी होती. परंतु देव लोकांमध्ये विष कोण स्वीकारेल हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी हे हालाहल पचवले. या विषामुळे त्यांचा कंठ मात्र निळा रंगाचा झाला म्हणून त्यांना निळकंठ नाव पडले. हे हलाहल प्राशन केल्यानंतर रात्रभर भगवान शंकराच्या अंगाचा दाह झाला, रात्रभर जागरण झाले. त्यांच्या अंगाचा दाह शमवण्यासाठी देव लोकांनी विविध प्रयत्न केले. पहाटे हा दाह शांत झाला. म्हणून महाशिव-रात्र प्रसंगी शिवपिंडीवर अभिषेक करताना पूजाविधीमध्ये दूध, दही, मध असे दाहशामक पदार्थ वापरले जातात. भगवान शिवाच्या अंगाचा दाह जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही, असा निश्चय सर्व देवांनी केला. तेव्हापासून महाशिवरात्रीला उपवास करण्याचा प्रघात आहे…..
मुहूर्त
यंदाचा महाशिवरात्री मुहूर्त हा 1 मार्च रोजी पहाटे 3 वाजून 16 मिनिटांनी सुरू होऊन 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता संपतो. शिव मंदिरात पूजन करण्यास विशेष महत्त्व आहे. घरी शिवपिंड असल्यास तिचे पूजन करावे.
पूजा साहित्य
शिवपिंड, बेलाची पाने, रुद्राक्ष, धोतरा फुल, हळद-कुंकू, अक्षता, पंचामृत, अष्टगंध, धूप, दीप, नैवेद्यसाठी खीर…… .
पूजा विधी
प्रथम देव्हाऱ्यातील गणपती पूजन करून घ्यावे. त्यानंतर ताम्हणात शिवपिंडी दक्षिणोत्तर ठेवून त्यावर पंचामृताचा अभिषेक करावा. नंतर शुद्ध पाण्याने शिवपिंड धुऊन घ्यावी. नंतर स्वच्छ पुसून त्यावर अक्षदा, पांढरे फूल, बेलपान, वाहावे. ओम नमः शिवाय मंत्र जप चालू ठेवावा. शिवपिंडीला अष्टगंधाचा त्रिपुंड लावावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. हार फुल वाहावे. प्रथम गणपतीची, देवीची, भगवान शंकराची आरती करावी, त्यानंतर कर्पूरारति करावी, शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणावी….
महाशिवरात्र हा सण जगभर शिवभक्त साजरी करतात. ज्योतिर्लिंग दर्शन व अभिषेक यास या दिवशी विशेष महत्त्व आहे. शिवलीलामृत महारुद्र ओम नमः शिवाय जप पठण आवश्य करावे. या दिवशी केलेला उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात. फळे, भगर, साबुदाणा, खिचडी, रताळ्याचा गोड तिखट शिरा, उपवासाचे पदार्थ यादिवशी खातात. विशेष म्हणजे महाशिवरात्री दिवशी मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विविध शिवमंदिरात अभिषेक सुरू असतात. महाशिवरात्री दिवशी रुद्राक्ष धारण करण्यास विशेष महत्त्व आहे. याबाबतची माहिती उद्याच्या लेखात बघू..
ओम नमः शिवाय