इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या टोमॅटो असा उल्लेख केला तरी श्रीमंत झाल्यासारखे वाटावे एवढे त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेशात तर एका भाजी विक्रेत्याने दुकानाबाहेर बाऊन्सर उभे केले आहेत. अशा परिस्थितीत १२० ते १५० रुपये किलो दराने विकले जाणारे टोमॅटो वाहून नेणारा ट्रक रस्त्यावर पलटी झाल्यानंतर काय घडले असेल याची कल्पना करून बघा.
तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातून दिल्लीच्या दिशेने एक ट्रक निघाला होता. त्या ट्रकमध्ये १८ टन म्हणजेच तब्बल २२ लाख रुपयांचे टोमॅटो होते. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात टोमॅटोचे पिक चांगले होते. तेथूनच हा ट्रक तेलंगणा मार्गे दिल्लीच्या दिशेने निघाला होता. पण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर चालकाला ट्रक अनियंत्रित झाला आणि अपघात झाला. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही. पण सध्या माणसाच्या जीवापेक्षाही जास्त भाव मिळत असलेले टोमॅटो त्या ट्रकमध्ये होते. ट्रक पलटी झाल्यानंतर टोमॅटो खाली पडले. मात्र त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे सर्वांचे लक्ष अर्थातच ट्रककडे जाणार होते. पण एरव्ही उशिरा पोहोचणारे पोलीस या घटनेच्या वेळी तातडीने दाखल झाले. तिथे आल्यानंतर त्यांनी कडेकोट बंदोबस्त उभा केला. एखाद्या व्हीआयपीप्रमाणे टोमॅटोला सुरक्षा दिली. त्यामुळे लोक आजुबाजुने जात राहिले पण, कुणीही पोलिसांची सुरक्षा भेदून टोमॅटोपर्यंत पोहोचू शकले नाही.
पोलिसांचे मानले आभार
ट्रकच्या चालकाने पोलिसांचे आभार मानले. २२ लाख रुपयांच्या टोमॅटोचे नुकसान झाले असते तर मालकाने पूर्ण पैसे वसूल केले असते. पण पोलीस वेळेत आल्यामुळे मोठे संकट टळले आहे, अशी भावना चालकाने व्यक्त केली.