टोमॅटोतील तेजी टिकून राहण्याचे संकेत
- ज्ञानेश उगले (सह्याद्री फार्म्स, मोहाडी, जि. नाशिक)
१. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मे, जून, जुलै या महिन्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो रोपांची लागवड झाली. मागील वर्षी राज्यात 52 हजार हेक्टरवर ही लागवड झालेली होती. यावर्षीची लागवड 57 हजार हेक्टरहून अधिक झाली आहे.
२. सुरवातीच्या काळात पावसाने बराच काळ ओढ दिली. दरवर्षी या काळात पावसामुळे 30 ते 40 टक्के पिक खराब होते. यंदा ते झाले नाही. परिणामी पिक चांगल्या स्थितीत राहिले व पुढे ते एकाच वेळी बंपर उत्पादन बाजारात आले.
३. याच काळातील पाऊस तसेच कोविडचे वातावरण याचाही या बाजारावर परिणाम झाला. सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे दर गडगडले. ही परिस्थिती पहिल्या 2 ते 3 आठवड्यांपर्यंत तशीच टिकून राहिली.
४. त्यानंतर मात्र हळूहळू दरात सुधारणा सुरु झाली. या घटनेच्या 1 महिन्यानंतर मात्र दरात किमान 10 पटीने वाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसून आले.
५. मे, जुन, जुलै या 3 महिन्यांच्या काळात टोमॅटोची जी लागवड झाली होती त्यातील 85 टक्के लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खराब झाली असून हे पिक संपण्याच्या मार्गावर आहे.
६. नाशिक भागात नागपंचमीच्या दरम्यान जी लागवड होते. ती मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के जास्त आहे. उशिरा येणाऱ्या वळवाच्या पावसाने या पिकाला चांगलेच झोडपले आहे. या लागवडीचे 30 ते 35 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. पावसाची हीच स्थिती पुढे राहिली तर पिकाचे 50 टक्क्यांपर्यंत नुकसान होईल. या परिस्थितीत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान मार्केट मध्ये टोमॅटोचा तुटवडा निर्माण होईल.
७. ‘सह्याद्री फार्म्स’चे व्यवस्थापक (भाजीपाला व्यवहार) दिनेश लगड यांच्या मते नोव्हेंबर मध्ये ज्या लागवडी होतील त्यांनाही चांगले दर मिळतील अशी स्थिती आहे.
८. जोरदार पावसाच्या तडाख्यातून टोमॅटोचे जे पिक वाचले आहे त्याची चांगली काळजी घेणे महत्वाचे आहे. अर्थात त्या दृष्टीने टोमॅटो उत्पादक प्रयत्नांची शिकस्त करतांना दिसतही आहेत.