नवी दिल्ली – आपल्या अन्नपदार्थात किंवा जेवणात टोमॅटोसह कांदा खूपच महत्त्वाचा मानला जातो. याच दोन भाज्यांमुळे जेवणाची चव वाढते. परंतु एकीकडे इंधनाचे दर वाढत असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे भाज्या आणि फळांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. टोमॅटो उत्पादक क्षेत्रात अतिपाऊस झाल्यामुळे त्याची लाली वाढून तो रुसून बसणार आहे.
टोमॅटोचे वाढीव भाव आगामी दोन महिने कायम राहण्याची चिन्हे असल्याची बाब क्रिसिल रिसर्चच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. टोमॅटोचे मुख्य उत्पादन होत असलेल्या कर्नाटकमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की यंदा नाशिकमधून तेथे टोमॅटो पाठविला जात आहे, असे क्रिसिलने अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, ऑक्टोबर-डिसेंबरच्या दरम्यान प्रमुख टोमॅटोचे उत्पादन क्षेत्र असलेल्या कर्नाटकात (सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक), आंध्र प्रदेशात (सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक) आणि महाराष्ट्रात (सरासरीपेक्षा २२ टक्के अधिक) पाऊस पडल्यामुळे उभे पिके आडवी झाली आहेत. याच राज्यातून देशभरात टोमॅटोचा पुरवठा केला जातो.
१४२ टक्क्यांची वृद्धी
क्रिसिलच्या अहवालानुसार, २५ नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोच्या भावात १४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये पिकांची कापणी जानेवारीपासून सुरू होईपर्यंत आगामी दोन महिने टोमॅटो भाव खाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत टोमॅटोचा भाव ४७ रुपये प्रतिकिलो आहे. टोमॅटोची ताजी आवक सुरू झाल्यानंतर भाव ३० टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
कांद्याचे भाव
कांद्याच्या भावाबाबत क्रिसिलच्या अहवालात म्हटले की, ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख उत्पादन क्षेत्रात पेरणी विलंबाने झाली. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कांद्याची आवकही विलंबाने झाली. सप्टेंबरच्या तुलनेत कांद्याच्या दरात ६५ टक्के वाढ झाली आहे. हरियाणामधून दहा-बारा दिवसात कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बटाट्याची स्थिती
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि गुजरातमध्ये अतिपाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामातील बटाट्याच्या लावणीचा हंगाम प्रभावित झाला. शेतांमध्ये पाण्याचे तळे साचल्यामुळे बटाट्याच्या कंदाच्या लावणीचा पुन्हा केली जाऊ शकते. त्यामुळे शेकर्यांचा खर्च वाढणार आहे. जर आगामी काळात पाऊस कायम राहिला तर बटाट्याचे भावही गगनाला भिडू शकतात.
इतर भाज्याही महाग
क्रिसिलच्या माहितीनुसार, आगामी तीन आठवड्यात भेंडीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि गुजरातसारख्या उत्पादन क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्पादन क्षेत्र प्रभावित झाले आहे. शिमला मिरची आणि काकडीसह इतर भाज्यांचे उत्पादनही प्रभावित झाले आहे.