नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटोचे दर अव्वाच्या सव्वा झाल्याने सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहेत. त्यामुळेच सोशल मिडीयासह सर्वत्र सध्या टोमॅटोची चर्चा होत आहे. केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. आता यासंदर्भात केंद्र सरकारने संसदेत माहिती सादर केली आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात माहिती दिली आहे की, महाराष्ट्रातील नाशिक, नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून तसेच मध्य प्रदेशातूनही नवीन पिकांची आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार विभाग टोमॅटोसह 22 जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किमतींवर लक्ष ठेवतो. टोमॅटोच्या सध्याच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत टोमॅटोची खरेदी सुरू केली आहे आणि हे टोमॅटो ग्राहकांना अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहे.
राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (NAFED) आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईंमधून सातत्याने टोमॅटो खरेदी करत आहेत आणि ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यानंतर ते दिल्ली-एनसीआर, बिहार, राजस्थान येथील प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देत आहेत. या टोमॅटोची सुरवातीला किरकोळ बाजारातली किंमत 90रुपये किलो ठेवण्यात आली होती. 16-07-2023 पर्यंत ही किंमत 80 रुपये किलोपर्यंत कमी करण्यात आली होती आणि आता 20-07-2023 पासून ती 70 रुपये किलोपर्यंत कमी करण्यात आली आहे. टोमॅटोच्या किंमतीतील सध्याच्या वाढीमुळे शेतकर्यांना टोमॅटोचे आणखी पीक घेण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.