नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय राहिलेल्या टोमॅटोने सामान्यांना रडवलेले असतानाच महागलेल्या टोमॅटोच्या प्रश्नाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी लालबुंद झाल्याची माहिती आहे. टोमॅटो महागल्याच्या संदर्भात एका टीव्ही चॅनेलच्या पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्याच्यावर स्मृती इराणी भडकल्याची माहिती आहे.
टोमॅटो यंदा विक्रमी दर गाठला आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे दर कमी झालेले असले तरी संपूर्ण देशभराचा विचार करता अद्याप दर नियंत्रणात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर एका टीव्ही चॅनेलच्या पत्रकाराने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना टोमॅटोच्या दरवाढीबाबत प्रश्न केला. जेव्हा टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका झाला, तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला असता स्मृती इराणी संतापल्या. त्यांनी टीव्ही पत्रकार सुधीर चौधरींना प्रतिप्रश्न केला,‘सुधीरजी, तुम्ही जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा काय झाले, असे मीही तुम्हाला विचारू शकते.’ तसेच टोमॅटो दरवाढीवरून प्रश्न विचारणे हा खासगी प्रश्न आहे, असेदेखील स्मृती इराणी म्हणाल्या.
या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पत्रकार सुधीर चौधरी हे ‘आज तक जी-२० समिट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलाखत घेत होते. त्यावेळी त्यांनी टोमॅटोच्या भाववाढीवरून प्रश्न उपस्थित केला असता इराणी यांनी संताप व्यक्त केला. या मुलाखतीमधील काही सेकंदाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या प्रकरणी चौधरींना झाला होता कारावास
२०१२ मध्ये तत्कालीन ‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांच्यासह ‘झी बिझनेस’चे संपादक समीर अहलूवालिया यांच्या लाचखोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना २० दिवस तुरुंगातही जावे लागले होते. काँग्रेसचे माजी खासदार आणि उद्योगपत्ती नवीन जिंदल यांच्या तक्रारीवरून सुधीर चौधरी आणि समीर अहलूवालिया यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोघांनी जिंदल कंपनीकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला होता.