इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टोमॅटोकडे सध्या मौल्यवान दागिण्याच्या नजरेतून बघितले जात आहे. असा एक दागिणा जो विकला तर थेट करोडपती होण्याचीच संधी आहे. आणि या संधीचा फायदाही शेतकऱ्यांना मिळतोय, हे महत्त्वाचे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका शेतकऱ्याला टोमॅटोने करोडपती केल्यानंतर आता तेलंगणातील एका शेतकऱ्यानेही नशीब काढलं आहे.
टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहे. काही ठिकाणी १२० रुपये तर कुठे १४० रुपये प्रती किलो असा भाव आहे. बऱ्याच वर्षांनंतर टोमॅटोला एवढा भाव आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी संयम ठेवला आणि टोमॅटो रस्त्यावर फेकले नाहीत, त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. त्याचाच लाभ तेलंगणातील शेतकऱ्याला मिळाला आहे. मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावातील बी महिपाल रेड्डी या शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक विकून गेल्या १५ दिवसांत जवळपास दोन कोटी रुपये कमावले आहेत.
महिपाल रेड्डी आधी त्यांच्या २० एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. पण, त्यानंतर त्यांनी टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले. तेलंगणामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात जास्त तापमान असते. हे तापमान टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य नसते, त्यामुळे तापमान आणि हवामानाचा परिणाम नियंत्रित करण्यासाठी त्यांनी १६ लाख रुपये खर्चून आठ एकर टोमॅटो लागवड क्षेत्रात जाळी बसवली. शेड बांधले. त्यामुळे टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन आले. २५ ते २८ किलो टोमॅटोच्या पेटीला २५ ते २७ हजार रुपये भाव मिळाला. असे जवळपास ७ हजार क्रेट त्यांनी २ कोटी रुपयांना विकले.
राज्याबाहेर जातात टोमॅटो
रेड्डी एप्रिलमध्ये टोमॅटोची पेरणी करतात आणि जूनच्या अखेरीस पीक काढणीसाठी तयार होते. ते शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि स्टेकिंग पद्धती वापरतात. रेड्डी यांचे टोमॅटो हैद्राबादच्या बोयनपल्ली, शाहपूर आणि पाटनचेरू मार्केट आणि त्याच्या बाहेरील भागात विकले आहेत.