नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी संकटांनी शून्यावर आणून ठेवलेले आयुष्य पुन्हा उभा करत असताना मजुरी करण्यापासून ते महिला शेतकरी असा शोभा कैलास पाटील या नवदुर्गेचा खडतर प्रवास जाणून घेऊया…
१९९३ साली शोभा यांचा निळवंडी येथील कैलास पाटील यांच्याशी विवाह झाला. सासरी आल्यानंतर सासू -सासरे ,दोन दीर असा सर्व एकत्र परिवार होता .घरी सर्व साधारणच परिस्थिती होती . १९९५ ला त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतरचा काळ हा शोभा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता कारण हे बाळ एक वर्षाचे असतानाच पती कैलास पाटील यांची एका आजाराने तब्येत खालावत गेली आणि १९९६ साली त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अगदी काही वर्षांचा हा संसार पूर्णपणे विखुरला गेला होता. ह्या घटनेतून त्या बाहेर पडत नाही तोच त्यांचे एकत्रित असलेले कुटुंब विभक्त झाले. आता परिस्थिती आणखी कठीण झाली होती. कारण विभक्त झाल्यानंतर जमीन वाट्याला मिळाली नव्हती.
राहायला एक छोटी पडवी होती आणि हाती एक वर्षाच्या मुलाची जबाबदारी होती. त्यावेळी अनेकांनी सुचवले कि शोभा यांच्या हातात काहीही नसल्याने त्यांनी माहेरी जाऊन राहावे. त्यावेळी शोभा यांनी मनात एकच विचार ठेवला कि माझ्या हातात काहीही नसले तरी माझ्याजवळ एक गोंडस बाळ आहे आणि त्याच्यासाठीच मी परिस्थितीशी लढेल. हे बाळ लहान असताना काही नातेवाईकांनी मदत केली. पुढे मुलगा शाळेत जायला लागला तेव्हा स्वतः उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घर चालविण्यासाठी हाती जमीन नसल्याने त्यांनी मोलमजुरी करायला सुरुवात केली.
२००३ मध्ये अडीच एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली आणि शोभा यांच्या शेतीमधील प्रवासाला सुरुवात झाली. मोलमजुरी सोडून आता आपल्या या शेतीतूनच भविष्य घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतीची सुरुवात करताना अडचणी बऱ्याच होत्या. पण त्यांचा मुलगा हा या पूर्ण प्रवासात एक ऊर्जास्रोत होता. सर्वात पहिली अडचण म्हणजे जमीन ही अतिशय मुरमाड स्वरूपाची होती. यामध्ये कोणत्याही पिकाची शेती करायची ठरल्यास त्यासाठी भांडवल देखील नव्हते. सुरुवातीला स्वतः कष्ट करून या जमिनीला कसण्यायोग्य बनवले. भांडवलासाठी कर्ज घेण्याचे ठरवले पण तारण म्हणून देण्यासाठी काहीही नसल्याने आपले सोने गहाण ठेऊन कर्ज घेतले. आता या शेतीमध्ये पीक कोणते घ्यायचे हा पुढचा प्रश्न होता.
त्यावेळी शोभा यांच्या मनात एक विचार चालू होता की शेतीमध्ये एकाच पिकावर अवलंबून राहिलो आणि वातावरण किंवा बाजारभावाची अडचण आल्यास नुकसान होऊ शकते. त्यासाठी मग शेतीचे भाग करून वेगवेगळ्या पिकांची लागवड त्यांनी केली. त्यावेळी टोमॅटो, कांदे, घेवडा, सोयाबीन अशी पिकं घेतली. यामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाले तरी इतर पिकांमधुन उत्पन्न मिळत होते. पुढे शेतीमधील उत्पन्न चांगले येत गेले. त्यातूनच मागील सर्व कर्जाची परतफेड केली. एकट्याने सर्व परिस्थिती सावरत असताना त्यांनी अनेक संकटाना तोंड दिले.
दरम्यान २०१९ मध्ये टोमॅटोची जाळी उचलत असताना मार लागून शोभा यांना दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. शस्त्रक्रियेनंतर पुढचे एक वर्ष शेतीतील कुठलेही काम करता आले नाही. या आजारातून बरं होण्यासाठी त्यांची जिद्द हीच त्यांच्यासाठी मोठं औषध ठरली. पुन्हा त्या शेतीत उभ्या राहिल्या. अडीच एकर शेतीचे तीन भाग करून त्यात घेवडा, मिरची आणि टोमॅटोची लागवड केली जात आहे. आपल्याला राहण्यासाठी एक सुरक्षित घर असले पाहिजे हा विचार मनात कायम चालू असायचा. २०२१ साली एक बंगला बांधून आपले हे घराचे स्वप्नदेखील त्यांनी पूर्ण केले. सर्वात मुख्य म्हणजे शोभा यांचे स्वप्न होते मुलाला उच्चशिक्षण द्यायचे आणि या शेतीतून आलेल्या उत्पन्नातून पुढे मुलाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
आपल्या आईच्या संघर्षाविषयी मुलगा पंकज याच्या मनात प्रचंड कृतज्ञतेची भावना आहे. तो म्हणतो… “दगड गोट्यांनी भरलेली नापीक जमीन ते आताची सुपीक कसदार जमीन आणि कुडाचं घर ते टोलेजंग बंगला हे चित्र केवळ आईच्या कष्टामुळे बदललं आहे. आज मी जो कुणी आहे तो आईमुळेच!
आज जगणं कृतार्थ झाल्याची भावना शोभा यांच्या मनात दाटून आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाला सलाम!
Tomato Farmer Shobha Patil Success Story
Agriculture