नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गांची व इतर रस्त्यांची त्वरित डागडूजी करावी.याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास टोल आकारू नये, असा निर्णय वजा इशारा नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)तर्फे निमा सभागृहात आयोजित उद्योजक, व्यावसायिक,व्यापारी आणि नागरिकांच्या प्रमुख २६ संघटनांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आला. वाहतुकीच्या मार्गात अडथळे ठरणारे अतिक्रमण काढावेत, हवाई सेवेचे व्यापक जाळे विणावे तसेच नाशिकहून मुंबईसाठी जलद रेल्वे सेवा सुरू करावी आदी बाबींसहित नासिक जिल्ह्याच्या विकासाला पूरक अनेक मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष, क्रेडाईचे हितेश पोद्दार, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, निपमचे हेमंत राख, चेंबरचे कांतीलाल चोपडा, लघु उद्योग भारतीचे विवेक कुलकर्णी, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, तानचे सागर वाकचौरे, प्रॅक्टिशनर इंजिनियर असोसिएशनचे अनिल कडभाने, आदी सहित मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या भावना खूप तीव्र दिसल्या. आपण सर्व टोल भरतो त्या तुलनेने रस्ते चांगले नसतील तर त्याचा उपयोग काय. मुंबईला जायला जर आठ-आठ तास लागत असतील तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे असा संतप्त सवाल करून रस्त्यांची डागडुजी लवकर न झाल्यास शासनाने स्वतःहून या मार्गांवरील टोल बंद करावे असा एकमुखी निर्णयही बैठकीत घेण्यात आला. वंदे भारत आणि जनशताब्दीच्या धर्तीवर नाशिकहून मुंबईला तीन तासात पोहोचवणारी जलद रेल्वे हवी, नाशिकहून मुंबईसाठी लोकल सेवेचे व्यापक जाळे विणले जावे,नाशिकला कोकणशी जोडण्यास औरंगाबाद-मडगाव रेल्वे सुरू करावी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित केलेल्या बाह्य रिंग रोडला त्वरित मंजुरी मिळावी, महापालिकेच्या बंद असलेल्या सर्व जकात नाक्यांजवळ ट्रक टर्मिनस उभारावे,नाशिकहून आणखी विविध ठिकाणी विमान सेवा सुरू करावी, शहर तसेच जिल्ह्यातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर उपाय शोधण्यास तसेच त्याला शिस्त लावण्यास सर्वांनी संयुक्त प्रयत्न करावेत, वाहतुकीची कोंडी कमी करण्यास सार्वजनिक वाहतूक सेवेवर सर्वांनीच भर द्यावा, नाशिक हे लॉजिस्टिकचे राष्ट्रीय हब व्हावे अशी जी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे त्याचा गांभीर्याने विचार व्हावा, शिंदे पळसे टोल नाक्यावर मनुष्यबळ वाढवावे, सीबीएससी सहित इतर काही रस्त्यावर राईट टर्न सुरू करावा. नासिक मुंबई महामार्गावर त्यांना अनधिकृत कट निर्माण झाले आहेत ते बंद करावेत जेणेकरून मुंबईला जाणारा जो विलंब आहे तो टळेल,ओझर विमानतळावरून सर्व ठिकाणी जाण्यास बस कनेक्टिव्हिटी हवी,नवीन नाशिक साठी आणखी एक रेल्वे स्टेशन मुंबई रस्त्यावरील पाडळी येथे हवे,नाशिक ते वडसा हा रेल्वे मार्ग तयार व्हावा, घरगुती गॅस पाईपलाईन साठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीला जो त्रास होतो आणि पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय होतात हे लक्षात घेऊन हे सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, नाशिक येथे आयआयटी आणि आयएएम महाविद्यालये सुरू व्हावीत,अंबडचा कचरा डेपो अन्यत्र हलवावा किंवा तो बंदिस्त करून परिसरात दुर्गंधी पसरणार नाही याची काळजी घ्यावी, नागरिकांच्या सनदच्या धर्तीवर उद्योजकांची सनद तयार करावी ही मागणी मंजूर झाली असून त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आदी महत्वपूर्ण सूचना बैठकीत करण्यात आल्या.
उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पाठपुरावासाठी सातत्याने बैठका घेण्याचे तसेच दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.बैठकीस निमाचे कोषाध्यक्ष विरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, कैलास पाटील नरेश पारख, गिरीश नवसे,,नंदन दीक्षित, सचिन पाटील,सचिन बागड, हितेश पोद्दार, मनोज वासवानी, आनंद सूर्यवंशी, राजेंद्र फड, संजय सोनवणे अमित अलई, मनीष रावल, किरण वाजे, गोविंद झा,दिलीप वाघ,सुधाकर जाधव,सागर देवरे,श्रीकांत पाटील,सुभाष जांगडा, निखिल तापडिया, संजय राठी, वैभव चावक,सतीश कोठारी यांच्यासह नाईस, निपम,निवेक,लघुउद्योग भारती, तान, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सराफ असोसिएशन, निर्यातदार संघटना आदी सहित नाशिक मधील सर्व प्रमुख २६ संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात व सकारात्मक अशी बैठक संपन्न झाल्याचे अनेक अध्यक्ष व पदाधिकारी यांनी यावेळेस आपले मत व्यक्त केले, तसेच आशा बैठकांमुळे नाशिकचे एक विजन डॉक्युमेंट तयार होईल व त्या डॉक्युमेंट च्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यास मदतगार होईल असेही यावेळेस उद्गार काढले.
Tolls closed until the roads are repaired; Warning of entrepreneurs and major 26 associations Nashik District Industrial Association