इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मेरठ-करनाल विभागातील भूनी टोल प्लाझा येथे १७ ऑगस्ट रोजी तैनात असलेल्या टोल कर्मचाऱ्यांनी लष्करी कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तनाच्या घटनेवर एनएचएआयने कठोर कारवाई केली आहे. एनएचएआयने टोल संकलन एजन्सी, धरम सिंग यांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे टोल संकलन फर्मला भविष्यात टोल प्लाझा बोलींमध्ये सहभागी होण्यापासून निलंबित करण्याची आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एनएचएआयने टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.
देशभरात टोल नाक्यावरील कर्मचा-यांबाबत अनेक तक्रारी आहे. त्यावर मात्र कारवाई होत नाही. पण, पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठी कारवाई करत थेट २० लाखाचा दंड ठोठावला आहे.
नेमकं काय घडलं
उत्तर प्रदेशमधील मेरठ-करनाल विभागातील भूनी टोल प्लाझा येथे लष्करी जवान व टोल कर्मचा-यांमध्ये वाद झाला. जवानाने ओळखपत्र दाखवूनही टोल मागितल्याने बाचाबाची झाली. यानंतर येथील कर्मचा-यांनी जवानाला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. रविवारी रात्री ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ८ ते १० जण जवानाला चारही बाजून घेरुन मारहाण करत होते. मेरठच्या सरुपूरमधील गोटका गावात राहणारे कपिल (२६) लष्करात कार्यरत आहेत. ते सध्या श्रीनगरमध्ये तैनात आहेत. महिनाभराची सुट्टी घेऊन ते गावी आले होते.