नवी दिल्ली – टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला असला तरीही अद्याप महिला हॅाकी संघाने पदकासाठीच्या झुंजीमध्ये आपले आव्हान कायम ठेवलेले आहे. आता सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाच्या आज होत असलेल्या सामन्याकडे लागून राहिल्या आहेत. भारतीय महिला हॅाकी संघ आज मैदानावर अर्जेन्टिना सारख्या बलाढ्य संघाविरुध्द लढणार आहे. मागच्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर या संघाचे वाढलेले मनोधैर्य बघता आपल्या ‘चक दे’ परफॅार्मन्सची झलक देवून पुन्हा एक आश्चर्यचकित निकाल या सामन्यातून समोर येवू शकतो, असा या क्षेञातील जाणकारांचा अंदाज आहे.टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाने इतिहास रचतांना दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर या संघाच्या विजयासाठी देशभरातून प्रार्थना आणि शुभेच्छांचा ओघ सुरु झाला आहे. सुवर्ण पदकापासून भारतीय महिला हॉकी संघ केवळ दोन पावलं दूर आहे.आज होणारा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल.