नवी दिल्ली – जगभरातील क्रीडाप्रेमी उत्कंठतेने प्रतीक्षा करत असलेला ऑलिम्पिक सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या संध्याकाळी 4:30 वाजेपासून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
कोविड-19 संकटामुळे भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्याऐवजी साधेपणाने उद्घाटन होणार आहे. प्रत्येक देशाचे सहा अधिकारी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थिती असतील. साधेपणाने उद्घाटन सोहळा होणार असला तरी टोक्यो स्टेडियम ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
यंदा प्रथमच भारताचे तब्बल 127 खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय क्रीडापटू हे तिरंदाजी, ऍथलेटीक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी (फेन्सिंग), गोल्फ, जिमनास्टीक्स, हॉकी, ज्युदो, रोईंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. भारतीय खेळाडूंच्या या चमूत 68 पुरुष खेळाडू आणि 52 महिला खेळाडू, 58 अधिकारी, आणि प्रशिक्षक, टीम अधिकारी यांच्याशिवाय 8 तात्पुरत्या स्वरुपाचे अधिकारी असा ताफा आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी देशाच्या विविध भागांतून शुभेच्छा संदेश येत आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही टोक्यो ऑलिम्पिक मधील भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी “हमारा विक्टरी पंच” हे हॅश टॅग अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “हमारा विक्टरी पंच” संदर्भात एक व्हिडिओ बनवून पाच व्यक्तींना टॅग केले आहे. त्यांनी कायदा व न्यायमंत्री किरेन रिजिजू, क्रिकेटपटू वीरेंदर सेहवाग, अभिनेता अक्षय कुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना टॅग केले.
भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जनतेने सुद्धा आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत व्हिडीओ बनवून “हॅश टॅग हमारा विक्टरी पंच” शेअर करावा तसेच इतर व्यक्तींना टॅग करावे असे आवाहन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.